सांगली : महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (16 जानेवारी) सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. प्रभागनिहाय मतमोजणी होणार असून एकावेळी सहा प्रभाग याप्रमाणे मतमोजणी होईल. सुरुवातीला एकावेळी प्रभाग क्रमांक 1, 3, 5, 15, 12 आणि 9 या प्रभागांची मतमोजणी सुरू होईल. प्रभाग क्रमांक 16 व 19 ची मतमोजणी शेवटी होईल.
मिरज शासकीय गोदाम (सेंट्रल वेअर हाऊस) येथे मतमोजणी होणार आहे. सहा निवडणूक क्षेत्रीय कार्यालयनिहाय मतमोजणीची व्यवस्था केली आहे. एकावेळी सहा प्रभागांची 14 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. प्रभाग क्रमांक 6, 9, 14 व 16 या चार प्रभागात बूथ संख्या जास्त असल्याने मतमोजणीच्या तीन फेऱ्या, तर उर्वरित 16 प्रभागांत मतमोजणीच्या 2 फेऱ्या होणार आहेत. प्रथम प्रभाग क्रमांक 1, 3, 5, 15, 12, 9 या सहा प्रभागांची मतमोजणी एकावेळी सुरू होईल. त्यानंतर प्रभाग क्रमांक 2, 4, 7, 17, 13 व प्रभाग क्रमांक 10 या सहा प्रभागांची मतमोजणी होईल. त्यानंतर प्रभाग क्रमांक 8, 6, 20, 18, 14 आणि प्रभाग क्रमांक 11 ची व त्यानंतर प्रभाग क्रमांक 16 व प्रभाग क्रमांक 19 ची मतमोजणी होईल.