Crime News Pudhari Photo
सांगली

Sangli News : वाळेखिंडीत हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेस मारहाण

परस्परविरोधी तक्रारींवरून १७ जणांवर जत पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जत : वाळेखिंडी (ता. जत) येथील श्री सिद्धनाथ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादातून पदभार स्‍वीकारण्यासाठी आलेल्या मुख्याध्यापिकेस मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी तक्रारींवरून जत पोलिस ठाण्यात एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुख्याध्यापिका रुक्मिणी गुलाबराव शिंदे यांना शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण केल्याच्या आरोपावरून ११ जणांविरुद्ध, तर शिक्षिका विमल चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण केल्याच्या आरोपावरून ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुख्याध्यापिका रुक्मिणी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ ते ११ ऑगस्टदरम्यान संशयित व्यक्ती त्यांच्या केबिनमध्ये आल्या. त्यांनी मुख्याध्यापक पदाची खुर्ची खाली करण्यास सांगून विमल चव्हाण यांच्या पदभारासंदर्भात वाद घातला. या वेळी शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की करण्यात आली. आपली मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती न्यायालयाच्या आदेशानुसार झालेली असून, शिक्षण विभागाकडून पदभाराबाबत कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी विमल भाऊसाहेब चव्हाण, प्रियांका शरदराव शिंदे, सतीश भानुदास शिंदे, शिवाजी पांडुरंग शिंदे, शिवनाथ गुलाबराव शिंदे, बाजीराव शिंदे, गुलाबराव बापूसाहेब शिंदे, मनोज विलास शिंदे, अनिल पांडुरंग शिंदे, किसन महादेव माने व सुरेश शामराव शिंदे (सर्व रा. वाळेखिंडी) या ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, शिक्षिका विमल चव्हाण (वय ५३, रा. शेगाव, ता. जत) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुख्याध्यापक पदाचा चार्ज स्वीकारल्याच्या कारणावरून शाळेतील कार्यालयात वाद घालून शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. तसेच संग्राम शिंदे यांनी कारने उडवून देण्याची, तर अन्य एकाने खोटे गुन्हे दाखल करून नोकरी घालवण्याची धमकी दिली.

या तक्रारीवरून रुक्मिणी गुलाबराव शिंदे, गुलाबराव नामदेव शिंदे, संग्राम गुलाबराव शिंदे, गणेश मुरलीधर शिंदे, उल्हास ज्ञानाबा शिंदे व नामदेव बाजीराव शिंदे (सर्व रा. वाळेखिंडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ ते १० ऑगस्टदरम्यान ही घटना घडली असून, १८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT