जत : वाळेखिंडी (ता. जत) येथे गुळवंची रस्त्यावरील पाटील मळा परिसरात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. ही घटना शनिवार, दि. ११ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव महादेव कोलेकर (वय ६५, रा. पारे, ता. खानापूर) व आबासाहेब नामदेव माने (वय ५५, रा. आंबेगाव, ता. कडेगाव) हे दोघे दुचाकीवरून (क्र. एमएच-१० सीबी ३४६५) गुळवंची ते वाळेखिंडी मार्गावरून निघाले होते. भीमराव कोलेकर दुचाकी चालवित होते. दुपारी दीडच्या सुमारास पाटील मळा परिसरात त्यांचा ताबा सुटल्याने दुचाकी घसरून हा अपघात झाला.
अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले आबासाहेब माने यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात चालक भीमराव कोलेकर हे देखील जखमी झाले आहेत.
याप्रकरणी शंकर नामदेव माने (वय ४९, रा. आंबेगाव, ता. कडेगाव) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालक भीमराव कोलेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे व पथकाने भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.