सांगली : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) ३१ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार तब्बल ३ लाख ८२ हजार २६३ मतदार वगळण्यात आले असून, जिल्ह्याची एकूण मतदार संख्या आता २१ लाख ९१ हजार ७० वर आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत नागरिकांनी आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
ही प्रारूप यादी मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय सर्व उपविभागीय अधिकारी (मतदार नोंदणी अधिकारी), तहसील कार्यालये आणि मतदान केंद्रांवर ती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यादीत नाव नसल्यास प्रपत्र क्र. ६ भरून नवीन नोंदणी करता येईल. नावात आक्षेप असल्यास प्रपत्र क्र. ७, तर ईपीक व दुरुस्तीसाठी प्रपत्र क्र. ८ भरता येणार आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे, तर त्यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अपील करता येईल.
पुढील एसआयआर कार्यक्रम
प्रारूप मतदार यादी
प्रसिद्धी : ३१ ऑगस्ट
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी :
३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर
नोटीस, दावे व हरकती निकाली काढणे : ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर