सांगली : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमानुसार बुथ लेव्हल अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम ३० जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आला. या एसआयआरमध्ये सुमारे ३ लाख ७० हजार मतदार संख्या विविध कारणांनी कमी झाली आहे. आता २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, यानंतर संबंधितांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
सांगली जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८ ऑगस्टअखेर २५ लाख ७३ हजार ३३९ मतदारांपैकी २५ लाख ४८ हजार १५७ मतदारांना ‘ईएफएस’ वितरित करण्यात आले असून हे प्रमाण ९९.०२ टक्के आहे. यापैकी २४ लाख १८ हजार ४२४ मतदारांचे प्रत्यक्ष डिजिटायझेशन पूर्ण झाले असून त्याचे प्रमाण ९३.९८ टक्के आहे.
मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम आता संपला आहे. या मोहिमेत एकूण मतदारांच्या १४.५ टक्के मतदारांची घट झाली आहे. ही संख्या सुमारे ३ लाख ७० आहे. आता मतदार केंद्रांचे सुसूत्रिकरण, पुनर्रचना, २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर असा राहील. नोटीस टप्पा, दावे व हरकती निकालात काढणे २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर आहे. अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनानित कामही निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, बीएलओ आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.