विटा : येथील विटा-कराड रस्त्यावरील डी.टी.डी.सी. पार्सल ऑफिसमध्ये शरीरास अपाय करणाऱ्या नशेच्या औषधांच्या बाटल्यांचे पार्सल मागवल्याप्रकरणी दोघांवर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या या धडक कारवाईत २१ हजार ७७५ रुपये किमतीच्या ५० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबररोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि महेश देशमुख यांना कुरिअर ऑफिसमध्ये अपायकारक औषधांचे संशयास्पद पार्सल आल्याची बातमी मिळाली. यानंतर सांगलीच्या अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सोपान वाढे यांनी विटा पोलिसांसह नाना पाटील पुतळ्याजवळील कुरिअर ऑफिसमध्ये छापा टाकला. त्यावेळी 'टर्मिबुस्ट मेफेटरमाईन सल्फेट' इंजेक्शनच्या (३० मि.लि.) ५० सीलबंद बाटल्यांचा साठा मिळून आला. हे पार्सल दिलीप बाबुराव ठोंबरे आणि जयेश राजेंद्र लोंढे (दोघेही रा. विटा) यांनी मागवल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानुसार दोघांवर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी दिलीप ठोंबरे याच्यावर यापूर्वी जुलै २०२४ मध्ये असाच गुन्हा दाखल आहे. सध्या दोघेही संशयित पसार असून पोलिस उपनिरीक्षक संग्राम पाटील प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.