विटा : पुढारी वृत्तसेवा : विटा येथील यशवंतनगरमधील भर वस्तीतील एका कापड दुकानासमोर असणाऱ्या दत्तात्रय तारळकर यांच्या होलसेल फटाकेच्या गोडाऊनला आज (दि.१) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
यात एक वृद्ध महिला ठार झाली. तर सहाजण जखमी झाले आहेत. कलावती शिवदास तारळकर (वय ८६) असे तिचे नाव आहे. तर दत्तात्रय शिवदास तारळकर (वय ५६), मानसी शंकर पवार, योगिता शंकर पवार (वय ३०), दीपाली दत्तात्रय तारळकर (वय २८), वर्षा दत्तात्रय तारळकर (वय ५२), कल्पना विजय जाधव (वय ३७) अशी जखमींची नावे आहेत
या आगीत गोडाऊनमधील फटक्याचा स्टॉक जळून खाक झाला. तर तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. काही युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दत्तात्रय तारळकर यांचा यशवंत नगरात भर वस्तीतल्या घरात फटाकेचे गोडाऊन बरोबरच फटाक्यांत दारू भरून ते वेगवेगळ्या स्वरूपात तयार करण्याचा कारखाना होता. आज दुपारी अडीचच्या दरम्यान, फटाक्यांत दारू भरण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. त्यावेळी दत्तात्रय यांची आई कलावती, पत्नी वर्षा, मुलगी दीपाली तसेच कल्पना जाधव, मानसी पवार, योगिता पवार तिथे होत्या. स्फोट अचानक झाल्याने दत्तात्रयसह बाकीचे तेथून पळून गेले. परंतु, दत्तात्रय यांची वृद्ध आई कलावती मात्र पळू शकली नाही. त्यामुळे ८० टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.