सांगली : सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विटा-तासगाव रस्त्यावर धडक कारवाई करत तब्बल ३८ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ९६५ ग्रॅम ‘मेफॅड्रॉन’ (एमडी) ड्रग्जसह ४२ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे विटा येथील श्री मंगल कार्यालयासमोर उभ्या असलेल्या एका पांढऱ्या मोटारीवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दत्तात्रय अंकुश पाखरे (वय ३२, रा. हिवरे, ता. खानापूर) यास ताब्यात घेण्यात आले. मोटारीची झडती घेतली असता एका प्लास्टिक पिशवीत फिकट पिवळसर रंगाची ९६५ ग्रॅम एमडी पावडर आणि रिकाम्या कॅप्सूल आढळून आल्या.
केरळ येथील अब्दुल निझार मोईद्दीन कुणी ऊर्फ आदिलखान आणि मोहम्मद शेमीर ऊर्फ समीर यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशयिताला कतार येथे नेण्यासाठी एक बॅग दिली होती. मात्र, संशयित कतारला न जाता मोबाईल बंद करून ती बॅग घेऊन हिवरे गावाकडे निघून आला. गावात आल्यावर बॅग उघडून पाहिली असता त्यात लाल-पांढऱ्या कॅप्सूलमध्ये एमडी ड्रग्ज भरलेले आढळले. या सर्व कॅप्सूल फोडून ती पावडर विटा परिसरात विक्री करण्यासाठी तो आला होता.
कारवाईत पोलिसांनी ३८ लाख ६० हजार रुपये किमतीचे ९६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, ४ लाख रुपये किमतीची मोटार (क्र. एमएच १० ई ६०५४), दोन मोबाईल संच आणि रिकाम्या कॅप्सूल असा, एकूण ४२ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे, विटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश साळुंखे, सहायक निरीक्षक राजेंद्र यादव, सायबर पोलिस ठाण्याच्या रुपाली बोबडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, संग्राम पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी ही कारवाई केली.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची शक्यता
याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळ येथील दोघांसह दत्तात्रय पाखरे याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजीव झाडे करत आहेत. कॅप्सूलमधून ड्रग्जची आंतरराष्ट्रीय तस्करी केली जात असल्याने या गुन्ह्यात रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.