सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी गांधी जयंतीच्यानिमित्ताने बाधित गावांतून गुरुवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दिवाळीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करून शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी लाडक्या बहिणींना दिवाळी भेट देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना बाधित शेतकर्यांनी हाकलून लावले आहे. गावांतील सर्व बाधित शेतकर्यांनी अधिकार्यांना लेखी पंचनामा करून विरोध दर्शविला आहे. असे असताना शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी पुन्हा भूसंपादन अधिकारी यांच्याकडून शेतकर्यांना नोटिसा देण्यात येत आहेत. शासनाच्या या दडपशाहीचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी शक्तिपीठ महामार्गबाधित 12 जिल्ह्यांतील सर्व शेकडो बाधित गावांत ग्रामपंचायत कार्यालयांसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीचे निवेदन ग्रामसेवकांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यभरात अस्मानी संकटात शेतकरी सापडला असून पावसाने तसेच नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण शेती, जनावरे, राहती घरे उद्ध्वस्त झाली आहेत, असे असताना अशा परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी करून शेतकर्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम शासन करीत आहे. गेल्या दीड वर्षापासून शेतकर्यांनी फोडलेला टाहो शासनाला ऐकू येत नाही. शेतकर्यांच्या डोळ्यांतील अश्रू दिसत नाहीत. शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरीव मदत करण्यात यावी.
जिल्ह्यातील तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, गव्हाण, अंजनी, मणेराजुरी, कवलापूर व इतर गावांतील शेतकर्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. दिगंबर कांबळे, शरद पवार (गव्हाण), घन:श्याम नलावडे, दत्तात्रय पाटील, विकास पाटील, धनाजी पाटील, नवीन पाटील, बाळासाहेब पाटील, मीरासो मुलाणी, रफिक मुलाणी, आनंदा टोकले, झाकीर मुलाणी, नितीन झांबरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.