नागज : वादग्रस्त शिक्षिकेला हजर करून पूर्वीच्या शिक्षिकेची बदली करून विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करीत चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी टाळे ठोकले.
चोरोची येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे 115 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला चोरोची जिल्हा परिषद शाळेची चुकीची माहिती देऊन या शाळेत तीन महिन्यापूर्वी एक अतिरिक्त शिक्षिका पाठवली असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. दरम्यानच्या काळात या शिक्षिकेला समायोजित करून या शाळेतील अन्य एका शिक्षिकेला अतिरिक्त दाखवून त्यांची बदली केली आहे. दरम्यान, चोरोची येथे हजर झालेल्या शिक्षिका पूर्वीच्या शाळेत वादग्रस्त ठरल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांना कोणतीही पूर्वसूचना न देता या वादग्रस्त शिक्षिकेची चोरोची शाळेत नेमणूक करून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा घाट पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने घातला आहे. यामुळे पालकांमध्ये संताप आहे. त्यामुळे पूर्वीचे शिक्षक कायम ठेवून वादग्रस्त शिक्षिकेची बदली करावी व मुलांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी पालकांची मागणी आहे. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने वारंवार लेखी मागणी करूनही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकले. वादग्रस्त शिक्षिकेची बदली करेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील, सरपंच पांडुरंग यमगर, गंगाराम विकास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश यमगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश यमगर, जनाप्पा खताळ, उपसरपंच संदीप यमगर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक यावेळी उपस्थित होते.