पशुवैद्यकीय महाविद्यालयास वाटाण्याच्या अक्षता 
सांगली

Sangli News : सांगली जिल्ह्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयास वाटाण्याच्या अक्षता!

सर्वपक्षीय नेते व्यक्तिगत उखाळ्या-पाखाळ्या काढण्यात व्यस्त; जनता तप्त

पुढारी वृत्तसेवा

विवेक दाभोळे

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर येथे नुकतेच शासनाने पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. मात्र ‌‘एक से बढकर एक‌’ अशा दिग्गज नेत्यांची मांदियाळी असून देखील सांगली जिल्ह्यात असे पशुवैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी नेतेमंडळी पाठपुरावा करत नाहीत. या नेत्यांचा केवळ एकमेकांच्या व्यक्तिगत उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. आपल्या सांगली जिल्ह्यातही असे पशुवैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी एकही नेता प्रयत्न करत नाही, हे जिल्ह्यासाठी दुर्दैवाचे ठरत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्हा दुभत्या पशुधनासाठी अग्रमानांकित आहे. मात्र या पशुधनासाठी उच्च पशुवैद्यज्ञानाची संस्था जिल्ह्यात नाही. एखादे चांगले, सर्वसुविधांयुक्त पशुवैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात होणे गरजेचे आहे. यातून पशुवैद्यकीय तंत्राचे उच्चशिक्षण घेतलेले पशुवैद्यक दुभत्या पशुधनासाठी चांगली सेवा देऊ शकतील. पण मुळात पशुवैद्यकीय महाविद्यालय व्हावे, असे नेत्यांना फारसे वाटत नसल्याचे वास्तव आहे. तसेच उच्च दर्जाची पशुवैद्यकीय उपचार सेवा उपलब्ध नसल्याने की काय, दुभत्या पशुधनासाठी पशुमालकांना अल्पशिक्षित वैद्यकांवर अवलंबून राहावे लागत आहे. गावगाड्यातील गोठ्यात पशुवैद्यकीय क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान जाण्यासाठी जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय होणे ही काळाची गरज आहे.

नेत्यांची कर्तव्यशून्यता

एकीकडे काही वर्षांपासून जिल्ह्यात दुभत्या पशुधनाचा टक्का घटू लागला आहे. गाई-म्हशींच्या पालनपोषणाचा वाढता खर्च, दुधाला मिळणारा कमी भाव आणि शासनाचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय याकडे होत असलेले दुर्लक्ष याचा परिपाक म्हणून जिल्ह्यात पशुधनाची संख्या कमी होत आहे. अशा काळात या पशुधनासाठी दर्जेदार पशुवैद्यकीय उपचार सेवा मिळणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. याला केवळ राजकारणात रमलेल्या नेत्यांची कर्तव्यशून्यता जबाबदार आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालय झाल्यास या चित्रात बदल होऊ शकतो.

कृष्णा-वारणेचे वरदान लाभलेल्या सांगली जिल्ह्यास बागायती टापूचे वरदान लाभले आहे. जिल्ह्यात पशुधनाची संख्या चांगली आहे. मात्र पशुधनाचा टक्का घटत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या दुग्ध व्यवसायाचा प्रमुख घटक म्हणजे पशुधन होय. पशुधनासाठी सन 2012 पर्यंत अगदी चांगली स्थिती होती. दुभत्या गाई, म्हशींच्या किमती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात होत्या. पशुधनाची संख्या देखील तशी उल्लेखनीय. परिणामी उपलब्ध पशुधनाला चांगल्या दर्जाची पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध असणे गरजेचे आहे. याचा विचार करता, सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज आहे.

आता तर तासगाव, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर या भागात टेंभू, ताकारी, आरफळ योजनांचे पाणी आले आहे. पाण्यामुळे शेती बागायती होत आहे. साहजिकच या भागात दुभत्या पशुधनाची संख्या वाढू लागली आहे. या पशुधनासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय पशुउपचाराच्या माध्यमातून प्रभावी योगदान देऊ शकते. रांजणी येथे शेळी-मेंढी पैदास केंद्राच्या जागेत अथवा मिरज येथे बंद अवस्थेत असलेल्या शासकीय दूध योजनेच्या जागेत देखील एखादे पशुवैद्यकीय महाविद्यालय होऊ शकते. अर्थात यासाठी नेत्यांकडून देखील ताकदीने पाठपुरावा होणे गरजेचे आहे.

काही वर्षांपासून शेतीकडील तरुणांचा कल कमी होत आहे. अर्थात काही प्रयोगशील तरुण जाणीवपूर्वक पशुधन संवर्धन, दूध उत्पादनाकडे वळत आहेत. मात्र याचवेळी शेतीच्या जागेत नवनवीन उद्योग सुरू होऊ लागले. यातून शेतीक्षेत्र घटले आहे. परिणामी पशुधनाच्या विशेषत: संख्येवर देखील मर्यादा येऊ लागल्या आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आता तर दुभत्या गाई, म्हशींच्या किमती सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात राहिल्या नाहीत. यातून नवनवीन प्रजातींच्या गाई- म्हशी विकसित करण्यासाठी पशुवैद्यकीय तंत्राचा उपयोग होऊ शकतो. यासाठी सांगली जिल्ह्यात हक्काचे पशुवैद्यकीय महाविद्यालय होणे काळाची गरज आहे.

आता विविध कारणांनी दुभत्या पशुधनासह पशुधन काही प्रमाणात घटू लागले आहे. याला आकडेवारी देखील पुष्टी देते. जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय झाल्यास जिल्ह्यातील पशुधनाला लाभ होईल.

जतमध्ये होता प्रस्ताव; विद्यापीठही अनुकूल

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत येथे कॅटल फार्मच्या तब्बल 83 हेक्टर जागेवर पशुवैद्यकीय महाविद्यालय व्हावे, असा शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दाखविली होती. तसेच नागपूर पशु विज्ञान विद्यापीठाच्या पथकाने या जागेची पाहणी देखील केली होती. तसेच या पथकाने यासाठी अनुकूलता देखील दर्शवली होती. मात्र यानंतर काहीच कालावधीत महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि हा प्रस्ताव देखील तसाच राहिला. अर्थात या प्रस्तावाचे भवितव्य तसे दोलायमानच झाले आहे.

दुग्धोत्पादनात अग्रेसर...

सांगली जिल्हा म्हैस आणि गाय दूध उत्पादनात राज्यात अग्रमानांकित आहे. जिल्ह्यात प्रतिदिन दुधाचे संकलन सर्वसाधारणपणे 14 लाख 50 हजार लिटरच्या घरात होते. तसेच दुभते पशुधन देखील मोठ्या संख्येने आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणात दुग्ध व्यवसायाचे मोठे महत्त्व राहिले आहे. यासाठी या दुभत्या पशुधनाला तातडीने उच्च पशुवैद्यकोपचार प्रसंगी मिळणे गरजेचे आहे. यासाठी देखील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची मोठी भूमिका राहू शकते. परिणामी याकरिता सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे.

सांगली जिल्ह्यात वाढलेली सिंचन सुविधा आणि कार्यरत असलेले सहकारी व खासगी दूध संघ यांचा विचार केला, तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पशुसंवर्धनविषयक व्यवसायातून फार मोठी उलाढाल या जिल्ह्यामध्ये होणार आहे. पशु उद्योजकता सुद्धा वाढीस लागणार आहे. या सर्वांसाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय मार्गदर्शन आणि सेवा उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यामध्ये स्वतंत्र पशुवैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज आहे. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना या माध्यमातून एक नवीन संधी देखील उपलब्ध होईल. विस्तारत चाललेल्या पशुसंवर्धन क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी त्यांना वाव मिळेल.
- डॉ. व्यंकटराव घोरपडे, सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, सांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT