Sangli Murder Case 
सांगली

Sangli Murder Case: वेदांत बंडगर हत्याप्रकरणी एकाला अटक

चौघे फरार; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : येथील अभयनगर भागात घडलेल्या वेदांत मारुती बंडगर या १४ वर्षीय बालकाच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी अत्यंत वेगाने सुरू केला आहे. या गुन्ह्यातील पाच संशयितांपैकी अतुल पोपट वायदंडे (रा. कुपवाड) याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित नीलेश गडदे आणि त्याच्या इतर तीन साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची चार विशेष पथके वेगवेगळ्या भागांत रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

यासंदर्भात संदीप बाळू बंडगर (वय ३३, रा. अभयनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित नीलेश गडदे, किरण लोखंडे, विशाल चौगुले, सागर चौगुले आणि अतुल वायदंडे (सर्व रा. कुपवाड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका गोळीबार प्रकरणात फिर्यादी पक्ष पोलिसांत दाद मागण्यासाठी गेला होता. याच कायदेशीर कारवाईचा राग मनात धरून संशयितांनी ११ जून रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास अभयनगर येथे वेदांत मारुती बंडगर या बालकावर पिस्तूलमधून गोळी झाडून त्याची निर्घृण हत्या केली. घटनेनंतर संशयित काळ्या रंगाच्या मोटारीमधून चिन्मय पार्क रस्त्याने फरार झाले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी तपासाची चक्रे गतिमान करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि संजयनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून संशयित अतुल वायदंडे याला गजाआड केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT