Vedant bandgar murder case 
सांगली

Vedant Bandgar Murder Case : गुंड नीलेश गडदेसह तिघांचा जामीन फेटाळला

खंडणीसाठी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा केला होता प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

सांगली : वेदांत बंडगर हत्याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून 'मोक्का' (महाराष्ट्र संघटित अपराध नियंत्रण कायदा) सारखी कठोर कलमे कमी करण्यात आल्यानंतर आणि त्यानंतर न्यायालयाकडून संशयितांचे जामीन अर्ज मंजूर झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर करावी आणि हलगर्जीपणा करणाऱ्यांवरही कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी हमाल कामगार संघटनेने आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान, खंडणीसाठी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने नीलेश गडदे, सॅन्डी उर्फ संदेश घागरे आणि किरण लोखंडे या तिन्ही संशयितांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.

वेदांत बंडगर यांची निर्घृण हत्या होण्यापूर्वी संशयितांनी जत शहराच्या मध्यवर्ती भागात येऊन हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केली होती. या गंभीर घटनेची दखल घेत जत पोलिस ठाण्यात ११ जून २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्यामध्ये नीलेश गडदे, सॅन्डी उर्फ संदेश घागरे आणि किरण लोखंडे यांच्यासह एकूण १० जण संशयित असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य संशयित नीलेश गडदे व त्याच्या इतर साथीदारांना अटक केली होती. संशयितांच्या वतीने जत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, संशयितांनी समाजात निर्माण केलेली दहशतीची परिस्थिती आणि पुराव्यांची छाननी केल्यानंतर न्यायालयाने नीलेश गडदे, सॅन्डी उर्फ संदेश घागरे आणि किरण लोखंडे यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT