Vedant bandgar murder case 
सांगली

Sangli Crime : वेदांत बंडगर खूनप्रकरणी आंदोलनाची तीव्रता वाढणार

बुधवारी हमाल, कामगारांचे बेमुदत काम बंद

पुढारी वृत्तसेवा

सांगली : वेदांत बंडगर या बालकाच्या खूनप्रकरणी संशयितांचा जामीन रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने १४ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. मात्र, शासन व प्रशासनाने अपेक्षित दखल न घेतल्याचा आरोप करत आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय हमाल पंचायतच्या बैठकीत घेण्यात आला.

गुरुवारी आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलक व बंडगर कुटुंबीयांशी संवाद साधून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस प्रशासन, तपास अधिकारी, बंडगर कुटुंबीय आणि आंदोलक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची सूचना केली होती. या सूचनेला जिल्हाधिकाऱ्यांनी संमती दर्शवूनही शुक्रवारी बैठक झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तीन दिवस चाललेल्या या धरणे आंदोलनाची प्रशासनाने योग्य दखल न घेतल्याने हमाल पंचायतने आंदोलनाचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे आंदोलन जनतेमध्ये नेले जाणार आहे.

शनिवार ते सोमवार या कालावधीत विविध देवस्थानांसमोर गाऱ्हाणे घालून वेदांतला न्याय मिळावा, अशी प्रार्थना केली जाईल. त्यानंतर मंगळवारी वेदांतच्या मारेकऱ्यांचे व त्यांना सहकार्य करणाऱ्या 'रावणाचे दहन' करण्यात येईल. त्यानंतर बुधवारपासून हमाल, तोलाईदार व महिला माथाडी कामगारांचे बेमुदत 'काम बंद' आंदोलन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा हमाल पंचायतने केली आहे. बैठकीला विकास मगदूम, बाळासाहेब बंडगर, राघू बंडगर, खंडू सोनूर, दिगंबर तुपलोंडे, भारत गायकवाड, उत्तम पांढरे, कोंडिबा मदने, उत्तम घागरे, अर्जुन सावंत, बजरंग मोहिते आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT