सांगली : वसंतदादा सहकारी कारखान्याची देणी भागवण्यासाठी 264.42 कोटी रुपये कर्ज देण्याचा प्रस्ताव जिल्हा बँकेसमोर आहे. आज, सोमवारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. बैठकीत या कारखान्याचा हा विषय विषयपत्रिकेवर घेतला आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यासह काही संचालकांनी बँकेचे आर्थिक हित डावलून सहकारातल्या पैशांनी खासगी उद्योजकाची तिजोरी भरण्याचे प्रयत्न चालवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वसंतदादा उद्योग समूहाचे यापूर्वीचे शंभर कोटी रुपयांचे देणे थकीत आहे. वास्तविक, वसंतदादा परिवारातील स्वप्नपूर्ती शुगर (40 कोटी रुपये), साखर कारखान्याची पाणीपुरवठा संस्था (21 कोटी रुपये), प्रकाश को-ऑपरेटिव्ह ॲग्रो प्रोसेसिंग (18 कोटी रुपये), वसंतदादा सहकारी दूध संघ (13 कोटी रुपये), वसंत बझार (3 कोटी रुपये) या आणि अन्य काही संलग्न संस्थांकडे जिल्हा बँकेचे सुमारे शंभर कोटी रुपये थकीत आहेत. यातील बहुतांश उद्योग बंद पडले असल्याने याच कर्जाची वसुली कशी होणार, हा प्रश्न आहे. अशा स्थितीत देणी भागविण्यासाठी पुन्हा कर्ज देण्याचा घाट असल्याची चर्चा आहे.
विरोध का..?
बँकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासात एखाद्या कारखान्याची देणी भागवण्यासाठी एकदाही कर्ज दिले गेलेले नाही
उद्योगांना केवळ उत्पादक कारणासाठी कर्ज देण्याची प्रथा आहे. यावेळी मात्र अनुत्पादक कारणांसाठी कर्ज दिले जाण्याची शक्यता
वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने आजवर घेतलेल्या कर्जाची परतफेड एकदाही वेळेत केलेली नाही