सांगली : मिरज शहरातील कचरा संकलन व स्वच्छता ठेक्यावरील चर्चेवेळी महासभेत मोठा गदारोळ झाला.  
सांगली

Sangli News| कचरा संकलन, स्वच्छता ठेक्यावरून रणकंदन

महासभेत मिरजेसंदर्भातील वक्तव्यावरून भडका; मिरजकर एकवटले; महापौरांसमोर घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : मिरज शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेसाठी २३.९५ कोटी रुपयांचा ठेका देण्याच्या प्रस्तावावरून शुक्रवारी महापालिकेच्या महासभेत मिरज आणि कुपवाडच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. स्वच्छता ठेका मिरजऐवजी कुपवाडमध्ये राबवावा, अशी मागणी कुपवाडच्या नगरसेवकांनी लावून धरली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले. 'मिरज म्हणजे कर, उत्पन्न कमी आणि अतिक्रमणात पुढे', असे वक्तव्य भाजपचे नगरसेवक संतोष पाटील यांनी करताच वाद चिघळला आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली. अखेर मिरज शहरासाठी २३ कोटी ९५ लाखांचा स्वच्छता ठेक्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

महापालिकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात महासभा झाली. महापौर धीरज सूर्यवंशी महासभेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे उपमहापौर गजानन मगदूम यांनी प्रभारी महापौर म्हणून अध्यक्षस्थान भूषवले. महासभेत स्वच्छता ठेक्याच्या प्रस्तावावरील चर्चेला भाजपचे कुपवाडचे नगरसेवक विश्वजित पाटील यांनी सुरुवात केली. या ठेक्यामुळे महापालिकेवर दरवर्षी एक कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. दरम्यान, शहर स्वच्छता ठेक्याचा हा प्रयोग प्रथम मिरजेतच का? तो कुपवाडमध्ये राबवावा, अशी मागणी त्यांनी केली. कुपवाड हा विस्तारित आणि विकासाच्यादृष्टीने मागे राहिलेला भाग आहे. तेथे खासगी एजन्सीमार्फत स्वच्छता व दैनंदिन कचरा संकलनाचा प्रयोग केल्यास ठेकेदाराच्या कामाची खरी कसोटी लागेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. विष्णू माने, प्रकाश पाटील, रवींद्र सदामते, दीपक वायदंडे, योगिता राठोड, मालुश्री खोत या नगरसेवकांनीही या मागणीला पाठिंबा दिला. रोहिणी पाटील यांनीही मिरजेपेक्षा कुपवाडमध्ये कचरा संकलन व स्वच्छता ठेका देण्याची अधिक गरज असल्याचे सांगितले.

मिरच्या लागल्या असतील तर..!

सभागृहातील वाढता तणाव पाहून संतोष पाटील यांनी, 'माझ्या बोलण्याने कुणाला मिरच्या लागल्या असतील किंवा त्रास झाला असेल तर मी माझे शब्द मागे घेतो,' असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मिरजेत घंटागाडी रोज येते, डम्पिंग ग्राउंड जवळ आहे. तुलनेत कुपवाडपासून डम्पिंग ग्राउंड दूर असून तो विस्तारित भाग आहे. तेथे कर्मचारीही कमी आहेत. त्यामुळे गुणवत्तेच्या निकषावर स्वच्छतेचा ठेका कुठे द्यायचा, याचा निर्णय महापौर आणि महासभेने घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, जगन्नाथ ठोकळे यांनी महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि शासनाने बदली, मानधनी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याचे निर्देश दिले असतानाही कार्यवाही रखडली असल्याकडे लक्ष वेधत नाराजी व्यक्त केली.

सभागृह नेते संदीप आवटे यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड ही तीनही शहरे आपलीच असल्याचे सांगत विषयपत्रिकेवरील प्रस्तावानुसार मिरज शहरातील कचरा संकलन व स्वच्छतेचा ठेका मंजूर करावा, अशी भूमिका मांडली. मिरजेतील महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि वाहने सांगली व कुपवाडमध्येही उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना केली. प्रभारी महापौर गजानन मगदूम यांनीही तीनही शहरांचा समतोल विकास, हेच ध्येय असल्याचे सांगत स्वच्छता आणि घंटागाडी व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची भूमिका मांडली. मिरज शहरातील कचरा संकलन व स्वच्छता ठेक्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले. एक (ज) अंतर्गत आलेले विषय व ऐनवेळचे विषयही मंजूर... म्हणत महासभा आटोपती घेतली.

कुपवाडची ग्रामपंचायत करा

कुपवाडच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे नगरसेवक विश्वजित पाटील यांनी आक्रमक होते. कुपवाड विकासात मागे आहे. सांगली-मिरजेत विकास केंद्रित होत आहे. कुपवाडला न्याय मिळत नसेल तर आम्हाला महापालिकेत राहायचे नाही. कुपवाडची ग्रामपंचायत करा, अशी संतप्त मागणी त्यांनी केली. कचरा संकलन व शहर स्वच्छतेचा प्रयोग प्रथम कुपवाडमध्येच राबवावा, यासाठी कुपवाडकर नगरसेवक विशेष आग्रही होते.

...अन्‌ भडका उडाला

मात्र, संतोष पाटील यांनी मिरजेच्या कारभारावरून टिपणी करताच सभागृहातील वातावरण तापले. 'आवटीसाहेब, मिरजेने खूप सत्ता भोगलीय. मिरज कर आणि उत्पन्नात मागे, मात्र अतिक्रमणात पुढे,' अशी टिपणी त्यांनी केली. या विधानाने मिरजेतील नगरसेवक संतप्त झाले. पक्षभेद बाजूला ठेवत मिरजेतील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले. संतोष पाटील यांनी विधान मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण यांनीही संतोष पाटील यांचे विधान चुकीचे असल्याचे सांगत, ते मागे घेतल्याशिवाय महासभा चालू देणार नाही, असा पवित्रा घेतला. संतोष पाटील यांचे विधान म्हणजे मिरजकरांचा अपमान असल्याचा पवित्रा काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे, बिलकिस बुजरूक यांनी घेतला. संतोष पाटील यांनी विधान मागे घ्यावे, यासाठी मिरज, कुपवाड आणि सांगलीचे काही नगरसेवक एकवटले. प्रभारी महापौरांसमोर घोषणाबाजी सुरू केली. प्रभारी महापौरांसमोरच ठिय्या मांडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT