सांगली ः सांगलीसह जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवारी अवकाळी पाऊस झाला. सकाळी ऊन, दुपारी पाऊस आणि सायंकाळी पुन्हा ऊन, असे विचित्र हवामान बहुतेक ठिकाणी होते. दरम्यान, या पावसाचा द्राक्षबागांसह खरिपातील काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. हा पाऊस थांबणार कधी? असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
यंदा मे महिन्यापासूनच सर्वत्र पाऊस सुरू झाला. मे, जून, जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये काही काळ पावसाने ओढ दिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस जोरदार झाला. आता पावसाने उघडीप दिली, असे वाटत होते. मात्र पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. गुरुवारी रात्री सांगलीत तुरळक पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. सांगलीसह मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, आटपाडी या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. यंदा सततच्या पावसाचा फटका शेतकर्यांना बसला आहे. ऐन खरीप पिकाच्या काढणीवेळी पाऊस आल्यामुळे शेतकर्यांना फटका बसला आहे. अनेक भागात मळणी सुरू आहे. पाऊस आल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू आहे. या द्राक्ष बागायतदारांनाही या पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान, पुढील आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.