Crime News pudhari photo
सांगली

Sangli Crime : उमदीत रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

पोलिसांसह साक्षीदार जखमी; ४० ते ५० जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

वळसंग : उमदी (ता. जत) येथील विठ्ठलवाडीतील रडेर-माळी वस्ती परिसरात सार्वजनिक रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना गुरुवार, दि. २२ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात ३२ जणांसह ४० ते ५० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलिस कर्मचारी व साक्षीदार जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद असून, द्राक्षबागेचेही मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रडेर-माळी वस्ती येथे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरून संबंधित व्यक्तींमध्ये वाद सुरू होता. यादरम्यान मध्यस्थी करत पोलिस कर्मचारी व साक्षीदार यांनी संबंधितांना वाद न वाढवता कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले. मात्र, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी एकाने फेकलेला दगड फिर्यादीच्या डाव्या डोळ्याखाली लागल्याने ते जखमी झाले. तसेच काही संशयितांनी पोलिसांच्या गणवेशाला धरून झटापट केली आणि काठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय, सहा ट्रॅक्टर, ट्रॉली व डोझरच्या साहाय्याने द्राक्षबागेतील कलम केलेली झाडे, वेली आणि द्राक्षपिकाचे नुकसान करण्यात आल्याची तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

सखाराम ज्ञानू मोटे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून, उमदी पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक साळवे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. सार्वजनिक रस्त्याच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तपासातून नेमके सत्य समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT