Life Imprisonment Pudhari
सांगली

Sangli Crime : खुनाबद्दल दोघा तरुणांना जन्मठेप

पूर्ववैमनस्यातून २०२२ मध्ये कवठेमहांकाळजवळ घडलेली घटना

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पूर्ववैमनस्यातून सदाशिव जगन्नाथ चौगुले (रा. अलकुड एस, ता. कवठेमहांकाळ) याचा खून केल्याबद्दल सौरभ विकास शिंदे (२१) व श्रीकांत चंद्रकांत पाटील ( २१, दोघे रा. नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली) यांना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनायक मधुकर देशपांडे यांनी काम पाहिले.

अलकुड एस (ता. कवठेमहांकाळ) येथील सदाशिव जगन्नाथ चौगुले याने वाघजाई मंदिरात चोरी केल्याचा आरोप होता. तरीदेखील तो आरोपींच्या घरात जाऊन त्यांनाच धमकी देत होता. याचा राग धरून दोन्ही आरोपींनी संगनमताने खून करण्याचा निश्चय केला. त्यानुसार १० ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान सदाशिव याचा अलकुड येथे धारदार हत्याराने व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार ठिकणे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यांनी या गुन्ह्यात ३० पेक्षा जास्त साक्षीदारांकडे तपास केला. त्याचप्रमाणे अनेक पंचनामे करून सीसीटीव्ही फुटेज व हत्यारे जप्त केली. या गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज व आरोपींचे फोटो अभिमतासाठी तज्ज्ञांकडे पाठवले. या खटल्यामध्ये डॉक्टर, तपास अधिकारी व न्याय वैज्ञानिक शाळेतील तज्ज्ञ श्रीमती कोरवी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

या खटल्यामध्ये फिर्यादीसह मृत व्यक्तीच्या जवळचे नातेवाईक असलेले साक्षीदारदेखील फितूर झाले होते.सरकार पक्षाला पोलिस कर्मचारी नितीन गायकवाड, वैभव काळे यांनी मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT