Drowning death Pudhari
सांगली

Sangli Drowning Death: सनमडी तलावात 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

एक मृत विद्यार्थी मच्छीमार कुटुंबातील; कुणीकोणूर गावावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

जत : सनमडी (ता. जत) येथील तलावात पाय घसरून पडल्याने दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हर्षद संजय कांबळे (वय 17) व जगदीश वसंत मोरे (15, दोघेही रा. कुणीकोणूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. कांबळे व मोरे दोघेही जवळचे नातलग आहेत. या घटनेने कुणीकोणूर गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संजय कांबळे यांची मच्छीमार संस्था आहे. त्यांच्याकडे सनमडी तलावातील मच्छीमारीचा ठेका आहे. ते मुलीच्या सीईटी परीक्षेसाठी विटा येथे गेले होते. घरातील हर्षद नेहमीप्रमाणे मासे पकडणाऱ्या वसंत बाळू मस्के यांच्याकडे गेला होता. मस्के हे मासे पकडण्यासाठी जाळे तलावात टाकत होते. यावेळी हर्षद व जगदीश दोघेही तलावाच्या काठावर जाळीलगत बसले होते. वसंत हे तलावात गेले होते, तर हर्षद व जगदीश काठावर होते. त्यांचा अचानक ओरडण्याचा आवाज आला. ते पाण्यात बुडत असल्याचे वसंत यांना दिसले. त्यांनी या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. सुमारे दीड तास प्रयत्न करून दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. घटना समजताच हर्षदच्या आईने हंबरडा फोडला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.

हर्षद मनमिळावू मुलगा होता. नुकतीच त्याने इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती; तर जगदीश हा आपल्या आजीकडे राहत होता. तो जत येथील आश्रमशाळेत शिकत होता. गुरुवारीच आश्रमशाळेला सुट्टी मिळाल्याने तो गावी आला होता; पण दुर्दैवाने या दोघांवरही काळाने घाला घातला. घटनास्थळी मन सुन्न करणारी परिस्थिती होती.

घटनेनंतर मृतदेहांची हेळसांड

दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमदी येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी तेथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. हे समजताच जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार संतप्त झाले. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्याकडे केली. शेवटी जत येथे ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा शवविच्छेदन करण्याचे ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT