सांगली : जन्म-मृत्यूच्या दि. ३१ डिसेंबर २०२३ पूर्वीच्या नोंदी 'एपीआय इंटिग्रेशन सिस्टिम'नुसार 'सीआरएस' (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम) पोर्टलवर अपलोड होणार आहेत. महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी रजिस्टरमधील सुमारे १० लाख जुन्या नोंदी अपलोड करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जुना दाखला नसलेल्या नागरिकांना नवीन दाखला मिळण्यासाठी आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, दरमहा १०० दाखल्यांच्या मर्यादेमुळे निर्माण झालेला गोंधळ कायम आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या शिष्टमंडळासोबत सोमवारी महापालिकेत बैठक झाली. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जन्म-मृत्यू नोंदणी निबंधक डॉ. विजयकुमार वाघ, महापालिकेच्या उपायुक्त विद्या पाटील, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुचेता पवार, मिरजेच्या उपनिबंधक डॉ. मानसी घोडके, सांगली उपनिबंधक डॉ. रेखा खरात तसेच मनसेचे रोहित घुबडे, अमित पाटील, सुजित पवार, विजय मौर्य, संग्राम पाटणकर, कुमार सावंत, निलेश मोरे उपस्थित होते.
जन्म-मृत्यू दाखले मिळत नसल्यामुळे शाळा प्रवेश, महसूल विभागातील कामे, बँकिंगची कामे, आधार अपडेट तसेच इतर महत्त्वाची कामे रखडली असल्याचा मुद्दा सावंत यांनी मांडला. नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
केंद्र सरकारच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम (सीआरएस) पोर्टलच्या माध्यमातून १ जानेवारी २०२५ पासून क्यूआर कोड असलेले दाखले दिले जात आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांसाठी प्रत्येकी एकच लॉगिन आयडी दिला आहे. मागणी जास्त असून त्याप्रमाणात पूर्तता करता येत नसल्याने जुन्या-नव्या दाखल्यांसाठी नागरिकांना महिना-दोन महिने, तर काही वेळा तीन-तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.
३१ डिसेंबर २०२३ पूर्वीच्या नोंदीचे नवीन दाखले हवे असल्यास जुना दाखला जोडावा लागतो. मात्र अनेक नागरिकांकडे जुना दाखला नसल्याने महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदवहीत नोंद असतानाही दाखला मिळत नाही. यावर मनसेने आंदोलन करून लक्ष वेधले होते.
जुनी नोंद 'एपीआय इंटिग्रेशन सिस्टिम'नुसार सीआरएस पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. सुमारे १० लाख नोंदी अपलोड करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. दरमहा १०० दाखल्यांच्या मर्यादेबाबत रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) कार्यालयास कळवण्याचा निर्णय झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
शाळा प्रवेश अडविला जाणार नाही
जन्म दाखला उपलब्ध नसल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचा शालेय प्रवेश अडविला जाऊ नये, यासाठी शाळा, शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना सूचना देण्यात येणार आहेत. आधार अपडेट करताना येणाऱ्या अडचणींबाबतही आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे उपायुक्त विद्या पाटील व डॉ. विजयकुमार वाघ यांनी सांगितले.
२१ दिवसांत नोंदणीचे आवाहन
जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. वेळेत नोंदणी झाल्यास दाखले मिळताना होणारा विलंब टाळता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.