सांगली; पुढारी वृत्तसेवा : विश्रामबाग येथील वालचंद कॉलेजमध्ये चोरी करताना दोघांना रखवालदाराने रंगेहाथ पकडले. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मारूती मुताप्पा पवार व यल्लाप्पा बापू पवार (दोघे रा. वडर कॉलनी, सांगली) अशी चोरट्यांची नावे आहेत. संशयित सोमवारी मध्यरात्री महाविद्यालयाच्या परिसरात घुसले. एका कार्यालयातील संगणक, मोटर पंप, पंखा व बाकडे त्यांनी चोरले. सकाळी साडेआठ वाजता हे साहित्य घेऊन ते कॉलेजच्या पाठीमागील रस्त्याने निघाले होते.
कॉलेजमधील रखवालदार गस्त घालत अचानक त्यांच्यासमोर आले. रखवालदारांना पाहून त्यांने साहित्य तिथेच टाकून पलायन केले. दोन रखवालदारांनी पाठलाग करून त्यांना पकडले. तेथून त्यांना मुख्य गेटवर आणले. विश्रामबाग पोलिसांना पाचारण करून त्यांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दोघांकडून कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेले साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी सचिन बाळासाहेब कदम (वय 46, रा. धामणी रस्ता, सांगली) यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजच्या परिसरात चंदनाची झाडे खूप आहेत. यापूर्वी चंदनाची झाडे कापून बुंदा पळवून नेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.
पकडलेल्या मारुती व यल्लाप्पा पवार यांनी चंदनाची झाडे चोरली आहेत का? याबद्दल तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरूद्ध यापूर्वी कोणत्या पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत का, याचीही चौकशी केली जात आहे.