ईश्वरपूर : हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेलेल्या ‘एमबीबीएस’च्या अंतिम वर्षातील दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. प्रशांत सुभाष पाटील (वय २५, मूळ रा. मुक्ताईनगर, जळगाव, सध्या रा. प्रकाश हॉस्पिटल, ईश्वरपूर) आणि गंगाधर रमेश सुंकुरवार (वय २४, मूळ रा. नांदेड, सध्या रा. प्रकाश हॉस्पिटल, ईश्वरपूर) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास वाळवा फाटा परिसरातील हॉटेल मूनलाईटजवळ घडली.
बुधवारी पहाटे सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू टीमच्या जवानांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. प्रशांत व गंगाधर हे प्रकाश वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत होते.
डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे...
प्रशांत व गंगाधर यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण होऊन नुकतीच इंटर्नशिप सुरू झाली होती. गंगाधर याचे वडील निवृत्त पोलिस हवालदार असून, त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन विवाहित बहिणी आहेत. तर प्रशांत हा शेतकरी कुटुंबातील हुशार मुलगा होता. इंटर्नशिप पूर्ण होण्याआधीच घडलेल्या या घटनेमुळे दोघांचेही डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
विहीर धोकादायक...
ईश्वरपूर-सांगली रस्त्याच्या कडेला आणि हॉटेलपासून काही अंतरावर ही विहीर आहे. विहिरीच्या कडेला कोणतेही संरक्षण कुंपण किंवा भिंत नाही. तसेच भोवती गवत आणि झाडे-झुडपे उगवल्यामुळे अंधारात विहीर सहज दिसून येत नाही. महामार्ग व हॉटेलजवळ असलेली ही विहीर अत्यंत धोकादायक बनली असून, त्यामुळेच हा भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे.