ईश्वरपूर : येथील नालबंद कॉलनी आणि राजेबागेश्वर परिसरातील बंद घरांची कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला असून, याप्रकरणी मुक्ताताई पांडुरंग शेवाळे (वय ६०, रा. नालबंद कॉलनी, ईश्वरपूर) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताताई शेवाळे या बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून शेजारील सुनंदा धडे यांच्या घरी गेल्या होत्या. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराची कडी कापलेली दिसली. आत जाऊन पाहिले असता कपाटातील साहित्य विस्कटलेले होते आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याच परिसरातील भगवान चंदू जाधव (वय ६५, रा. राजेबागेश्वर नगर, ईश्वरपूर) यांच्या घरातूनही चोरट्यांनी २५ हजार रुपये रोख, अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला.
दोन्ही घरफोड्यांमध्ये मिळून एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.