Death Pudhari
सांगली

Health Workers Death : कामाच्या तणावातून दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू

कुटुंबीयांचा आरोप; संघटनेची माहिती; सखोल चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा एका आठवड्यात मृत्यू झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र शेगाव येथील आरोग्य सहायकाने आत्महत्या केली, तर प्राथमिक आरोग्य केंद्र भोसे येथील आरोग्य सेवकाचाही मृत्यू झाला. कामाच्या अतिरिक्त ताण-तणावामुळेच या घटना घडल्याचा गंभीर आरोप संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केल्याची माहिती आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी दिली. तसेच या दोन्ही घटनांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पाटील म्हणाले, आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी करताना कर्मचाऱ्यांना बैठका, रिपोर्टिंग आणि विविध माहिती वेळेत सादर करण्यासाठी सतत दबावाला सामोरे जावे लागते. कामे तातडीने पूर्ण करण्यास प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जात असल्याने कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो. त्यांना स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देणेही कठीण झाले असून, वाढत्या कामाच्या व्यापामुळे कर्मचारी नैराश्येत जात आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमागील कारणे समोर येण्यासाठी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

अडचणी संघटनेकडे मांडा

कर्मचाऱ्यांनी कामाच्या ताण-तणावामुळे एकाकी न पडता कोणतीही अडचण असल्यास ती संघटनेकडे मांडावी, असे आवाहन दत्तात्रय पाटील यांनी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी संघटना नेहमीच प्रयत्नशील राहील. कोणत्याही कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलू नये, असे सांगत कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT