सांगली : ऊसतोड मजूर पुरवितो, म्हणून 18 लाख रुपये घेऊन दुधगावमधील दोन शेतकर्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अशोक अण्णा पाटील (रा. दुधगाव, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सन 2023 ते 24 या कालावधीत घडली. संशयित यासिन महंमद अली (रा. केरपानी, ता. नेपानगर, जि. बुरहानपूर, राज्य मध्य प्रदेश) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी अशोक पाटील आणि शांतिनाथ शामराव आडमुठे यांनी शेतातील ऊस तोडण्याकरिता संशयित मुकादम यासिन महंमद अली याच्यासमवेत करार केला होता. 2023-24 या गळीत हंगामात ऊसतोडीसाठी मजूर पुरविण्याचे ठरले होते. त्यानुसार दोघांनी संशयित यासिन याला 17 लाख 98 हजार 999 रुपये दिले होते. मात्र यासिन याने मजूर न पुरविल्याने दोघेही यासिन याच्यासमवेत आशापुरा येथे गेले. त्याने ‘उद्या टोळी घेऊन जाऊ’, असे सांगितले आणि तो तेथून निघून गेला. त्यानंतर संशयित यासिन याचा फोन बंद लागत असल्याने त्याची वाट पाहून फिर्यादी पाटील आणि आडमुठे हे आशापुरा येथून निघून दुधगावला आले. पाठपुरावा करूनही त्याने मजूर न पुरविल्याने त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित यासिन अली याच्याविरोधात फिर्याद दाखल केली.