तडीपार Pudhari File Photo
सांगली

Sangli Crime : भिलवडी, ईश्वरपूर परिसरातील दोन गुन्हेगारी टोळ्या हद्दपार

पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांचे आदेश; सहा महिन्यांसाठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी कडक पावले उचलली आहेत. भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमोद थोरात टोळीला तीन महिन्यांसाठी, तर ईश्वरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विजय साळुंखे टोळीला सहा महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळीप्रमुख प्रमोद सुरेश थोरात (वय ३२, रा. भिलवडी स्टेशन, ता. पलूस), राहुल किसन थोरात (वय २९, रा. तासगाव), सागर बाळासाहेब कदम (वय ३०, रा. भिलवडी नाका, तासगाव) आणि अमेय ऊर्फ अमेक्स संपतराव पाटील (वय २३, रा. येळावी, ता. तासगाव) या चौघांच्या टोळीविरुद्ध २०१८ ते २०२६ या कालावधीत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग, पेट्रोलियम टँकरमधून चोरी, मारहाण आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून घोडागाडी शर्यत घेणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावाची तासगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरण अवचर यांनी चौकशी केली. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी सुनावणी घेऊन या चौघांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले.

दुसऱ्या कारवाईत, ईश्वरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील टोळीप्रमुख विजय शंकर साळुंखे (वय २७), अतुल शंकर साळुंखे (वय ३०) आणि ओंकार मोहन कदम (वय २७) या तिघांच्या टोळीला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या टोळीवर २०१९ ते २०२५ या काळात खुनाचा प्रयत्न, हत्याराने जबर दुखापत करणे, गृहअतिक्रमण, गांजा आणि बेकायदेशीर देशी दारू विक्री, तसेच लोकसेवकावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. ईश्वरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्या चौकशी अहवालानंतर पोलिस अधीक्षकांनी या टोळीविरुद्ध तडीपारीचे आदेश दिले.जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT