बुधगाव : बुधगाव-बिसूर रस्त्यालगत असलेल्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटने ठिणगी पडून आग लागली. सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने आजुबाजूची पिके वाचवण्यात यश आले, मात्र या आगीत सुमारे अडीच एकर ऊस जळून खाक झाला.
शनिवारी दुपारी चारच्या सुमारास धनाजी पाटील यांच्या ऊस शेतीवरून गेलेल्या महावितरणच्या विजेच्या तारांमध्ये ठिणगी पडल्याने ही आग लागली. उन्हाचा तीव्र तडाखा आणि उसाचा वाळलेला पाला यामुळे आग बघता बघता वेगाने पसरली. यामुळे शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत डोळ्यांदेखत जळून राख झाली.
आग लागल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी ती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलाची वाहने पोहोचेपर्यंत अडीच एकर क्षेत्रातील ऊस जळाला होता. या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी आणि स्थानिक तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.