Turmeric Pudhari
सांगली

Turmeric research center Sangli :'टर्मरिक सिटी' संशोधन केंद्राच्या प्रतीक्षेत!

पुढारी विशेष-जिल्ह्यात दर्जेदार उत्पादन; देशाच्या एकतृतीयांश आवक; नेत्यांचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सांगली : विवेक दाभोळे

देशाच्या एकूण बाजारपेठेच्या एकतृतीयांश इतकी हळदीची उलाढाल ही सांगलीच्या बाजारपेठेत होते. तसेच सांगली जिल्हा हा हळद उत्पादनात देखील आघाडीवर आहे. मात्र 'टर्मरिक सिटी' असा उल्ल्लेख होत असलेला सांगली जिल्हा हा हळद संशोधन केंद्राच्या बाबतीत प्रतीक्षेतच राहिला आहे. विशेष म्हणजे 'एक से बढकर एक दिग्गज' असे लोकप्रतिनिधी असताना देखील याचा कोणी गांभीर्याने पाठपुरावा करत नसल्याचे खेदजनक चित्र आहे.

सांगलीची हळद देशातच नव्हे, तर अगदी सातासमुद्रापार प्रसिध्द आहे. दर्जेदार हळद उत्पादनासाठी, पारंपरिक वाणांसाठी इथला शेतकरी लौकिकपात्र ठरलेला आहे. सांगलीत खरे तर हळद संशोधन केंद्र होण्याची गरज आहे. याबाबत निर्णय मागेच होणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. सन २०२२ मध्ये सरकारने हिंगोली जिल्ह्यासाठी हळद संशोधन केंद्र मंजूर केले.

हिंगोलीत हळद संशोधन केंद्रास कोणाचा विरोध नाही आणि असण्याचे कारण देखील नाही. पण जवळपास दीडशेहून अधिक वर्षांची हळदीच्या बाजारपेठेची परंपरा असणाऱ्या सांगली जिल्ह्यात किंवा सांगलीत असे हळद संशोधन केंद्र का मंजूर होत नाही, असा सवाल करण्यात येत आहे.

वास्तविक पाहता, सांगली जिल्ह्यात हळद लागवडीस अजून देखील मोठा वाव आहे. अन्य राज्यांतून सांगलीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात हळद येते. याचे प्रमाण पाहता, तसेच प्रक्रिया उद्योग, विपणन आणि दर्जाची परंपरा याचा विचार करण्याची गरज आहे. अगदीच पाहिले, तर जागतिक बाजारात देखील सांगलीतील हळदीच्या दरावर हळदीचा दर निश्चित होतो.

प्रामुख्याने जिल्ह्यात राजापुरी, सेलम निजामाबादी आदी वाणांचीच लागवड केली जाते. जिल्ह्यात कृष्णाकाठीच हळदीचे पीक घेतले जायचे, पण अलीकडील सात-आठ वर्षांपासून वारणाकाठाने देखील हळद लागवड आणि उत्पादनात आघाडी घेतलेली आहे.

प्रामुख्याने प्रयोगशील शेतकरी हाच हळद पिकाकडे वळत असल्याचे चित्र आहे. या शेतकऱ्यांना हळद लागवड, पीक संगोपन, काढणी, शिजवणे, कच्च्या हळदीस बाजारात असलेली संधी, हळदीचे निर्यातीसाठीचे महत्त्व याबाबत शास्त्रशुध्द मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. असे सारे असताना तीनशे किलोमीटर अंतरावरील हिंगोली वसमत येथील हळद संशोधन केंद्राचा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कितपत उपयोग होणार, हा खरे तर सवाल केला जाऊ लागला आहे.

संशोधन केंद्र हवे यासाठी...

पारंपरिक वाणांपेक्षा अधिक उत्पादनासाठी नवीन वाणांसाठी एकरी उच्चांकी उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर हळदीला असलेली मोठी संधी, त्याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो याचे मार्गदर्शन करण्याकरिता औषध उद्योग, प्रसाधने उद्योगासाठी हळदीचे महत्त्व आणि त्याचा कसा उपयोग होऊ शकतो. निर्यातीसाठीची संधी दर्जेदार निर्यातक्षम हळदीचे उत्पादन यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी.

सांगलीची हळद नजरेत...

वार्षिक आवक : दोन लाख टन

देशाची वार्षिक आवक : साडेसहा लाख टन

देशाच्या एकूण आवकेच्या एकतृतीयांश हळदीची सांगलीत आवक

आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूतून होते सांगलीत आवक

सन १९३० मध्ये सांगलीतच हळदीच्या वायदे बाजारास प्रारंभ

एकरी उत्पादन : २१ ते २५ क्विंटल

हळद पीक नजरेत...

जगाच्या एकूणपैकी ८० टक्के क्षेत्र भारतात

मागील हंगामात देशात जवळपास २.२५ लाख हेक्टरहून अधिक हळद क्षेत्र

राज्यात साठ हजार हेक्टर हळदीचे पीक

संशोधन केंद्रामुळे हे होईल

चांगले, दर्जेदार बियाणांचे वाण

घटत्या एकरी उत्पादनात वाढ

विपणन आणि निर्यातीसाठीचे मार्गदर्शन

जिल्ह्यातून निर्यातीत वाढ शक्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT