सांगली ः तुंग (ता. मिरज) येथे दुचाकीवरून कॉलेजला निघालेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा दुभाजकाला धडकून जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश दीपक माळी (वय 19, रा. पोद्दार स्कूलजवळ, सांगली) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात नोंद आहे.
ऋषिकेश हा ईश्वरपूर येथील एका महाविद्यालयात बी.टेक.च्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो त्याच्या दुचाकीवरून सकाळी ईश्वरपूरकडे निघाला होता, तर त्याचे दोन मित्र दुसऱ्या वाहनावरून मागे होते. तुंग येथे त्याच्यासमोर एक दुचाकी जात होती. समोरील दुचाकी आणि रस्ता दुभाजकामधून पुढे निघून जाऊ, अशा अंदाजातून त्याने दुचाकी वेगाने नेली.
परंतु, अंदाज चुकल्यामुळे त्याची दुचाकी रस्ता दुभाजकाला वेगाने धडकली. या धडकेनंतर ऋषिकेश जवळपास 70 फुटांपर्यंत फरफटत जाऊन दुभाजकावरील साईन बोर्डला धडकला. यामध्ये त्याचे हेल्मेट फुटून डोक्याला अंतर्गत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी हा थरारक अपघात पाहिला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पाठीमागून आलेल्या त्याच्या मित्रांनी तातडीने आपत्कालिन रुग्णवाहिका बोलावली, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
कॉलेजचा शेवटचा दिवस ठरला आयुष्याचा शेवट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेशच्या कॉलेजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे तो उत्साहात दुचाकीवरून वेगाने ईश्वरपूरच्या दिशेने निघाला होता. मात्र, वाटेतच काळाने झडप घातल्याने कॉलेजचा हा शेवटचा दिवस त्याच्या आयुष्याचाही शेवटचा दिवस ठरला. या घटनेमुळे माळी कुटुंबासह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.