तासगाव : तासगाव शहरातील गणपती मंदिर ते बसस्थानक या मुख्य मार्गावर विटा उतरवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावरच उलटला. ही घटना शनिवार, दि. ३ रोजी घडली. ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा झाल्याने या प्रमुख मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
या रस्त्यावर एका इमारतीच्या कामासाठी ट्रकमधून विटा उतरवण्याचे काम सुरू होते. विटा उतरवत असतानाच अचानक ट्रकचा कंट्रोल सुटला आणि तो पुढील बाजूने कलंडून थेट रस्त्यावर उलटला. नागरिक व प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ धाव घेऊन उलटलेला ट्रक बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रक रस्त्यावरून हटवण्यात आला, त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पालिका प्रशासन कारवाई का करत नाही?
शहरातील मुख्य व वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने बांधकाम साहित्य उतरवले जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याबाबत वारंवार तक्रारी येऊनही नगरपालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अशा निष्काळजीपणावर पालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.