ईश्वरपूर : पेठ (ता. वाळवा) येथे महामार्गावरील पुलावर ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार धनाजी तुकाराम थोरात (वय 37, रा. ओंड, ता. कराड) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी शशांक राजाराम सुतार (वय 40, रा. मारुती मंदीराजवळ, ओंड) हे जखमी झाले. हा अपघात गुरुवार, दि. 11 रोजी सकाळी घडला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी शशांक सुतार यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी शशांक व त्यांचे मित्र धनाजी हे दुचाकीवरून (क्र. एमएच 05 एटी 5764) महामार्गावरून निघाले होते. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पेठ येथील पुलावर पाठीमागून आलेल्या ट्रकने (क्र. एमएच 11 सीएच 7001) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात पाठीमागे बसलेले धनाजी हे रस्त्यावर पडले. त्यांच्या हाताला, डोक्याला गंभीर मार लागला.
डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीचालक शशांक यांच्या पायाला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.