वळसंग ः कागणरी-जत मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला सोमवार, दि. 23 रोजी दुपारी दरिकोणूर येथील लांडगे वस्ती आणि मशिदीसमोर अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असून, सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, बस (क्र. एमएच 10 डीटी 3181) नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन जतकडे निघाली होती. दुपारी दरिकोणूर परिसरात ही बस आली असता, इंजिनच्या भागातून अचानक धूर येऊ लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरण्याच्या सूचना दिल्या.
प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने रौद्र रूप धारण केले आणि बसचा पुढील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आग वाढत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. काहींनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी तातडीने अग्निशमन दलाला आणि संबंधित विभागाला माहिती दिली. भररस्त्यात बसला आग लागल्याच्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एसटी प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे.