सांगली

Sangli Accident: ट्रॅव्हल्स झाडावर आदळून चालक, क्लीनर ठार

२२ प्रवासी बचावले; गुहागर-विजापूर महामार्गावर घोगाव येथे अपघात

पुढारी वृत्तसेवा

​कुंडल : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर घोगाव (ता. पलूस) हद्दीत मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेच्या आंब्याच्या झाडाला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, चालक आणि क्लीनर या दोघांचाही केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. बसमधील २२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. चालक परशुराम लक्ष्मण माळी (वय २५) आणि क्लीनर शिवाप्पा अण्णाप्पा पायमल्ले (२६, दोघेही रा. शिरगाव, ता. चिकोडी, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.

ओमसाई लिंक ट्रॅव्हल्सची बस सोमवारी (दि. २९) पुण्यातील निगडी येथून मिरजकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. मंगळवारी पहाटे बस घोगाव हद्दीत आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस चुकीच्या बाजूला जाऊन रस्त्याकडेला असलेल्या आंब्याच्या झाडावर वेगाने आदळली. केबिनमध्येच अडकल्याने चालक व क्लीनर त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले.

कुंडल पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेन मागवून बस रस्त्यावरून बाजूला घेतली आणि केबिनमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढले. अपघातातील प्रवासी शिवराज जगन्‍नाथ भोसले (२६, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृत चालक परशुराम माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक दिनेश काशिद करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT