माय-लेकराचा बुडून मृत्यू 
सांगली

Sangli drowning incident : माय-लेकराचा बुडून मृत्यू

डफळापूरच्या शेततळ्यातील दुर्घटना; पाण्याचा संघर्ष ठरला जीवघेणा

पुढारी वृत्तसेवा

जत शहर : पाणी आणण्यासाठी गेलेल्या आईला बुडताना वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचाही जीव गेला, तर तिघांना वाचवण्यात यश आले. डफळापूर (ता. जत) येथे मेंढपाळांच्या तळावर बुधवार, दि. 25 रोजी सकाळी ही घटना घडली. सुशीला विट्ट्याप्पा पडोळकर (वय 60) व त्यांचा मुलगा अनिल विट्ट्याप्पा पडोळकर (वय 25, दोघे रा. अक्कोळ, ता. निपाणी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत.

अक्कोळ येथील मेंढपाळ सध्या डफळापूर भागात आहेत. या मेंढपाळांच्या कुटुंबातील सुशीला या पाणी आणण्यासाठी जवळच असलेल्या शेततलावात उतरल्या असता पाय घसरून पाण्यात पडल्या. तलावात सुमारे 11 फूट पाणी होते. तलावाच्या कडेला प्लास्टिक अस्तर व शेवाळ असल्याने त्यांना पाण्याबाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यांची आरडाओरड ऐकून जवळच असलेल्या त्यांचा मुलगा अनिल याच्यासह चार नातेवाईकांनी तलावात उड्या घेतल्या. त्यात अनिलने आईला वाचवण्यासाठी जीवाची शर्थ केली; मात्र घाबरलेल्या सुशीला यांनी त्याला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. सुमारे 15 मिनिटांची धडपड व्यर्थ ठरली. मेंढपाळ मंगळवारी बाज येथून तळ उठवून डफळापूरजवळील दिलीप भोसले यांच्या मळ्यातील शेततलावालगत सुमारे 800 मेंढ्यांसह मुक्कामाला थांबले होते. आई व मुलाच्या मृत्यूने मेंढपाळांच्या तळावर एकच शोककळा पसरली. मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

तिघांना वाचवले

घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत तलावात वेळेत दोर टाकले. मोठ्या प्रयत्नानंतर हल्लाप्पा बासणे, सुनीता बासणे व लक्काप्पा पडोळकर यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT