भावाला शेवटचं बघितलं; नियतीनं बहिणीला पण नेलं 
सांगली

Sangli Tragedy : भावाला शेवटचं बघितलं; नियतीनं बहिणीला पण नेलं

लोक हळहळले ः भावावर अंत्यसंस्कार करून चाललेल्या बहिणीचा स्मशानभूमीजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

येडेनिपाणी : सत्तर वर्षांचा भाऊ... अचानक गेल्याचा निरोप आला आणि बहात्तर वर्षांची बहीण कोलमडून पडली. तिला तडक भावाच्या अंत्यदर्शनाला आणलं. मन घट्ट करून तिनं भावाला शेवटचं डोळं भरून बघितलं आणि परत आपल्या गावाकडं निघाली. पण ज्या स्मशानभूमीत अजून भावाची चिता पेटलेली होती, तिथंच ती बसलेल्या कारवर भलं दांडगं झाड पडलं आणि ती जागेवरच गेली. भावाला शेवटचं बघणाऱ्या बहिणीला पण नियतीनं नेलं... हे समजताच सारा गाव सुन्न झाला, पार गलबलून गेला. हा दुर्दैवी प्रसंग घडला, तो वाळवा तालुक्यातल्या कणेगावात.

कणेगावचे राजेंद्र गोविंद पाटील. सत्तरी आली आणि तब्येतीची कुरबूर सुरू झाली. अखेर शनिवारी सकाळी ते हृदयविकारानं गेले. मग रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पै-पाहुणे, भावकी-गावकी सारे गोळा झाले. या गर्दीत होती राजेंद्र पाटील यांची बहात्तर वर्षांची बहीण. उर्मिला. भाऊ गेल्याचा निरोप आल्या आल्या त्या पती उध्दव शिंदे यांना सोबत घेऊन बोरगावातनं तडक कणेगावला आल्या होत्या. भावाचं शेवटचं दर्शन घेताना त्यांचा ऊर भरून आला होता. साऱ्या आठवणींचा हुंदका दाटून आला होता. किती का वय होईना, पण बाईला माहेरचा आधार असतो, पाठबळ असतं, माहेरची माया असते. पण भाऊ गेला आणि त्यांचा माहेरचा आधार गेला.

भावाला शेवटचा निरोप देऊन रात्री अकरा वाजता त्या परत बोरगावला चालल्या. नजर परत मागं फिरत होती. डोळ्यांचं पाणी तुटत नव्हतं. नवऱ्याचा आधार घेत त्या कशाबशा गाडीत बसल्या. गाडी गावाबाहेर आली. बाजूला स्मशानभूमी दिसत होती. काय झालं माहिती नाही, पण अचानकच स्मशानभूमीकडेला असलेलं भलं दांडगं झाड कोसळलं. ते नेमकं यांच्या कारवरच पडलं. भाऊ गेल्याचा हुंदका अजून उरात आहे, तोवरच उर्मिला यांचा जागेवरच मृत्यू झाला.

पती उध्दव शिंदे, गाडीचा चालक आणि सोबत असलेली एक महिला सारे जखमी झाले. काय झालं समजलं नाही, पण झाड पडल्याचा आवाज झाला आणि सारा गाव स्मशानभूमीकडं पळाला. बघतात तर सारं संपलेलं. जखमींना बाहेर काढलं, रुग्णालयात नेलं, पण बहीण गेली होती. भावाच्या अंत्यसंस्काराला आलेली बहीण अशी अचानक अपघातात जावी, या प्रसंगानं उभ्या कणेगावाला धक्का बसला. उर्मिला यांच्या या अशा अपघातात जाण्यानं त्यांचे पती, दोन मुलं, मुलगी, सुना, नातवंडं यांना तर जबर धक्का बसला आहेच, पण कणेगाव आणि बोरगावकरांवरही दु:खाचं सावट पसरलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT