सांगली : ‘महाराष्ट्र ट्रान्स्पोर्ट ॲक्शन कमिटी’ने ट्रक, टेम्पो, टँकर, बस, रिक्षा, टॅक्सी, स्कूल बस अशा सर्व घटकांना ‘ई चलना’बाबत राबविली जाणारी प्रणाली व रस्त्यावर पोलिसांकडून वसुलीसाठी केली जात असलेली जबरदस्ती व अडवणूक, याविरुद्ध धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. शासनाने या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती महाराष्ट्र ट्रान्स्पोर्ट ॲक्शन कमिटीचे सदस्य बाळासाहेब कलशेट्टी यांनी दिली.
कलशेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. वाहतूक अप्पर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी परिपत्रक पोलिसांना जारी केले आहे. त्यानुसार ई चलन दंड भरण्यास वाहनचालक स्वेच्छेने तयार असतील, तरच भरून घ्यावा, वाहन जप्तीची कारवाई न्यायालयाच्या आदेशानेच करावी, चालकांना दंड भरून घेण्यासाठी जबरदस्ती करू नये, असे म्हटले आहे.