सांगली : कॉलेज कॉर्नर ते चिंतामणीनगर पूल रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.  
सांगली

Sangli News : उकरलेले रस्ते आणि रखडलेले पूल

सांगलीत वाहतुकीचे तीनतेरा; वाहतूकदारांमध्ये प्रचंड संताप; ‌‘रस्त्यां‌’साठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नंदू गुरव

सांगली : सांगली ही जिल्ह्याची राजधानी आहे की नुसतीच उकरलेली आणि रखडलेली नगरी आहे? असा सवाल सांगलीकरांना पडला आहे. राज्य महामार्गासह महिनो न्‌‍ महिने उकरून ठेवलेले महत्त्वाचे रस्ते आणि वर्ष-दोन वर्षं रखडलेले उड्डाण पूल यामुळे साऱ्या सांगलीत वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्याची कामं कधी पूर्ण होणार? रखडलेले पूल कधी उभे राहणार? असे संतप्त सवाल हजारो वाहनधारक रोज विचारत आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळं संतापलेले नागरिक आणि वाहतूकदार आता रस्त्यांसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

राज्य महामार्गाचेही गांभीर्य नाही

विटा-सांगली या राज्य महामार्गाची अनेक महिने उकराउकरी सुरू आहे. माधवनगरपासून बुधगाव-कवलापूरमार्गे कुमठे फाट्यापर्यंत हा महामार्ग अनेक महिन्यांपासून उकरून ठेवला आहे, जो पूर्ण होतच नाही. एकतर्फी धोकादायक वाहतूक जीवघेणी झाली आहे. जो रस्ता सुरू आहे, तोही धड नाहीत. हा महामार्ग कधी पूर्ण होणार, त्याचं उत्तर देणारी यंत्रणा कोम्यात गेली आहे.

साखर कारखाना ते कॉलेज कॉर्नर

हाच राज्यमार्ग जेव्हा उकरत उकरत सांगलीपर्यंत आला, तेव्हा मात्र त्याचा भयंकर त्रास जाणवायला लागला. साखर कारखान्यापासून औद्योगिक वसाहतीच्या गेटपर्यंत पहिला टप्पा, बायपास चौकापासून ते गेस्ट हाऊस कॉर्नरपर्यंत दुसरा टप्पा, तर तिथून कॉलेज कोपऱ्यापर्यंत तिसरा टप्पा... अशी सारी उकराउकरी करून ठेवली आहे. प्रचंड वाहतूक एकमार्गीच सुरू आहे. ॲम्ब्युलन्सला जायलाही जागा नाही.

अपुरा रस्ता... त्यात खड्डा...

कॉलेज कॉर्नरवर येणाऱ्या एकतर्फी रस्त्यावर दुर्गामाता मंदिरासमोर भलादांडगा खड्डा पडला आहे. पाण्याची पाईप फुटून गुडघाभर साचलेल्या पाण्यातून हजारो वाहनं गचके खात जाताहेत. अगोदरच अर्धा रस्ता चतकोर झाला आहे. जीव धोक्यात आले असतानाही, खड्डा मुजवायची जबाबदारी यंत्रणा घेत नाही.

पंचशीलनगर पूल कधी होणार?

चिंतामणीनगरचा रेल्वे पूल पाडला आणि त्यानंतर नवा उभा करायला दोन वर्षे गेली. उद्घाटनाअगोदरच खड्डे पडलेल्या या पुलावर दिव्यांचा पत्ता नाही. दुसऱ्या बाजूला पंचशीलनगर उड्डाण पुलाचं काम दीड-दोन वर्षं रखडत ठेवलं आहे. संथगतीनं चाललेल्या या उड्डाण पुलाचं काम लवकर पूर्ण होण्याची कसलीच शक्यता दिसत नाही.

कर्नाळ रस्ता बंद

शिवशंभो चौकातून सांगली शहरात येणारी प्रचंड वाहतूक ज्या रस्त्यानं येते, तो कर्नाळ रस्ता पुलाच्याच बांधकामासाठी कधीचा बंद करून ठेवला आहे. त्याचंही काम रखडलं आहे.

कोल्हापूर रोडची रडकथा...

सांगली - कोल्हापूर रस्त्याचं रुंदीकरण अजून किती काळ चालणार माहिती नाही. आकाशवाणी केंद्रासमोर रस्ता जीवघेणा झाला आहे. मोठ्या अपघाताची शक्यता आहे. पण यंत्रणेला याच्याशी सोयरसुतक नाही.

युध्दपातळी म्हणजे काय?

प्रचंड वाहतूक असलेल्या महामार्गाचं काम महिनो न्‌‍ महिने रखडत ठेवलं जातं. सकाळी तुफान वाहतूक सुरू होते आणि तेव्हाच रस्त्याची उकराउकरी, खडी, माती टाकणं, जेसीबी चालवणं एकाच वेळी सुरू होतं. अशी कामं रात्री का होत नाहीत? ती युध्दपातळीवर का पूर्ण केली जात नाहीत? असा सवाल नागरिक विचारतात.

सध्या महापालिका क्षेत्रामध्ये चांगले रस्ते उकरायचे आणि टक्केवारीसाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करायचे, हा कॉर्पोरेट भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सदर कामे सुचवताना, कोणी सुचवली, त्याची कारणे कुठेही स्पष्ट दिसत नाहीत. उदाहरणार्थ सांगली कॉलेज कॉर्नर ते कुमठे हा रस्ता सुस्थितीत असतानाही तो करण्याचा घाट घातला आहे. त्याला अडीचशे कोटी रुपये खर्च आहे. ते टेंडर कधी झाले? कधी, कोणी मॅनेज केले, हे विधानसभा निवडणुकीच्या काळात कळले सुद्धा नाही. वास्तवात सांगली बायपास ते माधवनगर, बुधगाव, कवलापूर या गावांना बायपास करून प्रस्तावित रिंग रोड करणे आवश्यक असताना, चुकीच्या पद्धतीने पैसे खर्च केले जात आहेत. याबाबत सत्ताधारी पक्षाचे आमदार, पालकमंत्री, अपक्ष खासदार असतील, यांना सोयरसुतक राहिलेले नाही.
- सतीश साखळकर, सामाजिक कार्यकर्ते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT