सांगली : विधानसभा निवडणुकीत महायुतीविरोधात महाविकास आघाडी, अशी लढत पाहण्यास मिळाली. मात्र, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पक्ष, महायुती, महाविकास आघाडीचा सोयीस्कर वापर करीत जिल्ह्यातील पारंपरिक विरोधकच आमने-सामने आलेले दिसत आहेत.
जिल्ह्यातील ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत आणि पलूस या सहा नगरपरिषदा आणि शिराळा व आटपाडी या दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदाचे 28 आणि नगरसेवकपदाचे 347, असे मिळून 375 अर्ज माघारी घेण्यात आले. यानंतर नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी 41, तर नगरसेवकपदांसाठी 594 उमेदवार रिंगणात आहेत. बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांची मनधरणी केली. काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश आले, तर काही ठिकाणी उमेदवारांनी अखेरच्या क्षणापर्यंत नेत्यांच्या मनधरणीस प्रतिसाद न देता अर्ज कायम ठेवला.
अर्ज माघारीनंतर ईश्वरपूर, आष्टा, शिराळा येथे दुरंगी, विटा, आटपाडी, पलूस येथे तिरंगी, तर जत, तासगाव येथे चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने शनिवारपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 17 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. नगरपालिकांसाठी तब्बल 1063, तर नगरपंचायतींसाठी 412 अर्ज दाखल झाले होते. या 1 हजार 678 अर्जांपैकी छाननीमध्ये 518 अर्ज अवैध ठरले. नगराध्यक्षपदाच्या 8 जागांसाठी 69, तर नगरसेवकपदांसाठी 941 अर्ज पात्र ठरले. यानंतर अर्ज माघारीची शुक्रवारी शेवटची मुदत होती. निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नाराजी वाढली होती. ज्येष्ठ नेत्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांची, शब्द देऊन समजूत काढण्यात काही ठिकाणी यश आले. परंतु, काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात अपयश आले.
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदाचे 28 आणि नगरसेवकपदाचे 347, असे 375 अर्ज माघारी घेतले गेले. यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या आठ जागांसाठी 41, तर नगरसेवक पदांसाठी 594 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना अपेक्षित होता. परंतु स्थानिक राजकारणानुसार चित्र बदलले आहे. अनेक ठिकाणी महायुतीत फूट पडली आहे, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद प्रकर्षाने समोर आला. ज्याठिकाणी समझोता शक्य झाला, तेथे स्थानिक स्तरावर युती करण्यात आली आहे.
शिराळा येथे आमदार सत्यजित देशमुख यांच्याविरोधात दोन नाईक एकत्र आले आहेत. ईश्वरपूर येथे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात सर्व विरोधक एकत्र आले आहेत. आष्टा नगरपरिषदेतही असेच चित्र आहे. पलूस येथे आमदार विश्वजित कदम यांच्याविरोधात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा भाजप, याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गट यांची युती, अशी तिरंगी लढत होत आहे.
विटा येथे आमदार सुहास बाबर यांच्याविरोधात माजी आमदार सदाशिवराव पाटील, अशी पारंपरिक लढत आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचेही उमेदवार आहेत. या ठिकाणी महायुतीचेच दोन घटकपक्ष समोरासमोर आहेत. महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडणूक मैदानात नाही.
तासगाव येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, माजी खासदार संजय पाटील यांची स्वाभिमानी आघाडी, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, अशी लढत होत आहे. जत येथे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडी, तर विरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप अशी लढत आहे. येथे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, त्याशिवाय शिवसेना एकनाथ शिंदे गटही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. आटपाडी नगरपंचायतीत शिवसेना, भाजपा व संयुक्त तीर्थक्षेत्र विकास आघाडी, अशी तिरंगी लढत होत आहे.
अपक्षांचा फटका कोणाला?
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी अपक्षांनी अर्ज कायम ठेवले आहेत. स्थानिक पातळीवर निवडणुकीत एक एक मत सुद्धा महत्त्वाचे असते. त्यामुळे याचा फटका कोणाला बसणार, याची उत्सुकता आहे.