सांगलीत व्यापार्‍याच्या घरातील जबरी चोरीचा डाव फसला 
सांगली

Sangli crime : सांगलीत व्यापार्‍याच्या घरातील जबरी चोरीचा डाव फसला

जमावाने केलेल्या मारहाणीत दोघे चोरटे जखमी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील दत्तनगर परिसरातील व्यापार्‍याच्या घरात घुसून बनावट पिस्तूल व चाकूच्या धाकाने जबरी चोरी करण्याचा प्रयत्न दोघा चोरट्यांनी केला; परंतु घरातील महिलांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी घरातून पलायन केले. यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत दोघे चोरटे जखमी झाले. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ रवींद्र कुकडे (रा. दत्तनगर, सांगली) आणि रोहित बंडू कटारे (रा. फौजदार गल्ली, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिवेश नरेंद्र शहा यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, फिर्यादी शहा यांचे सांगलीत कापड दुकान आहे. कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर परिसरात ते राहतात. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणारा सौरभ व त्याचा साथीदार रोहित यांनी मास्क घालून शहा यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी पिस्तूल व चाकूच्या धाकाने कुटुंबातील सर्वांना धमकावले. घरातील सर्व सोने आणि रोकड काढून देण्याची मागणी केली.

चोरट्यांनी शहा यांच्या कुटुंबातील एका महिलेच्या गळ्याला चाकू लावला. तेव्हा घरातील महिलांनी आरडाओरडा सुरू केला. घरातील एका महिलेने आरडाओरडा करत घराबाहेर पलायन केले. त्यामुळे शेजारी राहणार्‍या नागरिकांनी शहा यांच्या घराकडे धाव घेतली. घराबाहेर जमाव जमल्याचे पाहताच चोरटे बिथरले व त्यांनी घरातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु घराबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने त्यांनी जमावावरच पिस्तूल रोखत ठार मारण्याची धमकी दिली. परंतु यावेळी काही धाडसी तरुणांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाने पाठलाग करून दोघांना बेदम मारहाण केली. दगडाने व लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत दोघे चोरटे जखमी झाले.

याबाबतची माहिती सांगली शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT