मिरज : हातभट्टी, ताडी यासह विषारी दारू विक्री व निर्मिती केंद्रांबाबत दैनिक पुढारीने गेल्या तीन दिवसांमध्ये प्रसिद्ध केलेल्या विशेष वृत्ताची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी घेतली. विभागीय उपायुक्त व उत्पादन शुल्कचे अधीक्षक हे दोघेही फिल्डवर उतरून त्यांनी कारवाई सुरू केली. काल सांगली जिल्ह्यातील ११ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली.
"दारू चले आगे आगे, पीछे चले पोलिस", उत्पादन शुल्क विभाग "शुल्क" वसुलीतच मग्न, माणसे मेल्यावरच जागे व्हायचे काय? या मथळ्याखाली दैनिक पुढारीने गेल्या तीन दिवसांपासून विषारी दारूबाबत प्रकाशझोत टाकला. दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेल्या या विशेष लेखांची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी घेतली. विभागीय आयुक्त चिंचाळकर हे काल सांगलीमध्ये ठाण मांडून होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची त्यांनी मॅरेथॉन बैठक घेतली. बनावट दारू, हातभट्टीची दारू किंवा अन्य बेकायदेशीर दारूची निर्मिती, विक्री, वाहतूक करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे थेट आदेश त्यांनी यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकार्यांना दिले. त्यानंतर ते स्वतः आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगली जिल्ह्याचे अधीक्षक प्रदीप पोटे व त्यांच्या टीमने सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. अनेक ठिकाणी तपासणी केली.
त्यांनी काल दिवसभरामध्ये मिरज, जत, कवठेमहांकाळ, विटा यासह अनेक तालुक्यामधील अनेक ठिकाणी कारवाई करून एकूण ११ गुन्हे दाखल केले. त्यापैकी ९ वारस गुन्हे, तर २ बेवारस गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी एकूण ११ आरोपीना अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमध्ये ३२.७६ बल्क लिटर इतकी देशी दारू, ८५० लिटर रसायन, ३५ बल्क लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
सांगली जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्याचे पथक
दैनिक पुढारीशी बोलताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर म्हणाले, दैनिक पुढारीच्या वृत्तांची दखल घेऊन मी सांगली जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. त्यांनी या बनावट दारू वाहतूक, विक्री व निर्मिती करणाऱ्यांवर आणि ठिकाणांवर कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेतच. शिवाय सांगली जिल्ह्यामध्ये अशा कारवाया करण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक गोपनीयरित्या कारवाई करणार आहे.