सांगली : महापालिकेच्या कुपवाड कार्यालयातील मानधनावरील शाखा अभियंता अल आजम सलीम जमादार याने नगररचना विभागातील प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या बदल्यात आयुक्त सत्यम गांधी यांना लाच स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रकार केला. आयुक्त गांधी यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत जमादार यास सेवेतून बडतर्फ केले.
आयुक्त गांधी यांनी कुपवाड येथील विभागीय कार्यालयाला 28 एप्रिल रोजी भेट दिली होती. त्यावेळी कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती. नागरिकांना विचारणा केली असता नागरिकांनी नगररचना विभागाकडून कामे होत नसल्याची तक्रार केली. या कार्यालयात दैनंदिन कामकाजाचा निपटारा होत नसल्याचे आढळून आले. येथील स्थापत्य अभियंता अल आजम जमादार हे कार्यालयात अनेकवेळा उपस्थित नसल्याचे दिसून आले. हालचाल वहीत नोंद न करता, वरिष्ठांची परवानगी न घेता ते कार्यालय सोडत असल्याचे आढळून आले होते. दरम्यान, नगररचना विभागाकडील प्रस्तावास मान्यता देण्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याबाबत जमादार याने आयुक्तांना समक्ष विचारणा केल्याचाही प्रकारही घडला. वरिष्ठांना लाच स्वीकारण्याबाबत प्रवृत्त करत असल्याची अत्यंत गंभीर बाब घडली. आयुक्त गांधी यांनी नोटीस बजावली. नोटिसीला समाधानकारक उत्तर न आल्याने स्थापत्य अभियंता (मानधन) या सेवेतून कार्यमुक्त केले आहे. जमादार याच्याकडील महापालिकेचे ओळखपत्र, नगररचना विभागाकडील कामकाजाची कागदपत्रे नगररचना कार्यालय, महापालिका क्षेत्रीय कार्यालय क्रमांक तीन येथे तत्काळ जमा करावीत, असे आदेशही आयुक्त गांधी यांनी दिले आहेत.
महापालिकेतील लाच प्रकरणामुळे नगररचना विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. दैनिक ’पुढारी’ने ’नगररचना विभाग : खाबुगिरीचं दुकान’ या मथळ्याखाली नगररचना विभागाकडील कारभारावर प्रकाश टाकला. या पार्श्वभूमीवर आयुक्त गांधी यांनी अॅक्शन मोडवर येत नगररचना विभागाचा अभियंता जमादार याच्यावर सेवेतून बडतर्फची कारवाई केली.