चांदोलीत 'चंदा' वाघीण स्थिरावली  
सांगली

Sahyadri Tiger Reserve : चांदोलीत 'चंदा' वाघीण स्थिरावली

वर्ष पूर्ण; 'सेनापती'सोबत जोडी जमल्याने ‘गोड बातमी’ची आशा

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल नलवडे

शिराळा : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेली 'चंदा' ही वाघीण चांदोलीच्या जंगलात पूर्णपणे स्थिरावली असून तिने स्वतःचा अधिवास प्रस्थापित केला आहे. इतकेच नव्हे, तर सह्याद्रीतील नर वाघ 'सेनापती' याच्यासोबत तिची जोडी जमली असून दोघांचे मीलन झाल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे लवकरच सह्याद्रीत बछड्यांची चाहूल लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याच ‘गोड बातमी’ची सर्वांना आशा लागून राहिली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीने 'टायगर ऑग्मेंटेशन अँड रेंज एक्स्पान्शन' (टारा) हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याअंतर्गत सुमारे ९०० किलोमीटरचा प्रवास करून चंदा ही वाघीण २० नोव्हेंबर २०२५ रोजी चांदोलीत दाखल झाली होती. सुरुवातीला तिला 'सॉफ्ट रिलीज एन्क्लोजर'मध्ये ठेवून येथील वातावरण आणि भक्ष्याची सवय करून देण्यात आली. त्यानंतर तिला जंगलात मुक्त करण्यात आले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा आणि तारा या दोन्ही वाघिणींनी आता चांदोलीत स्वतःचे क्षेत्र निश्चित केले आहे. त्यांचे रेडिओ कॉलर ९ आणि १० एप्रिल रोजी 'ड्रॉप-ऑफ' तंत्रज्ञानाने आपोआप गळून पडले असून त्यांना सतत जीपीएसच्या देखरेखीखाली ठेवण्याची गरज उरलेली नाही. सध्या कॅमेरा ट्रॅप आणि पाऊलखुणांच्या (पगमार्क) आधारे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

सह्याद्रीत यापूर्वी सेनापती (एसटीआर-टी ०१), सुभेदार (एसटीआर-टी ०२) आणि बाजी (एसटीआर-टी ०३) हे तीन नर वाघ वास्तव्यास होते. त्यानंतर चंदा, तारा आणि पेंचमधून आलेली हिरकणी या तीन वाघिणी येथे दाखल झाल्या. सध्या सह्याद्रीत सेनापती-चंदा, सुभेदार-तारा आणि बाजी-हिरकणी अशा तीन जोड्या एकत्र वावरताना दिसत आहेत. याशिवाय राधानगरी-तिलारी-आंबोली मार्गे शिलेदार, रायबा, सरदार आणि राणोजी हे नवे नर वाघ आल्याने सह्याद्रीतील वाघांची एकूण संख्या दहावर पोहोचली आहे. वन विभागाच्या अंदाजानुसार या प्रकल्पात २७ वाघ सामावून घेण्याची क्षमता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांत १,१६५.५७ चौरस किलोमीटरवर आहे. यामध्ये ६००.१२ चौरस कि.मी. कोअर आणि ५६५.४५ चौरस कि.मी. बफर झोनचा समावेश आहे. वाघांच्या वाढत्या वावरामुळे चांदोलीतील पर्यटनाला आणि स्थानिक होम-स्टे व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. दुसरीकडे, बफर झोनमधील गावकऱ्यांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी वन विभागाने गस्त वाढवून जनजागृतीवर भर दिला आहे. एकेकाळी केवळ भ्रमणमार्ग असलेला सह्याद्री आता वाघांचे कायमचे घर बनत असल्याचा आनंद वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT