जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील वळसंग रस्तावर एका महिलेला गावात सोडण्याच्या बहणाने ६५ हजार सोने व रोख रक्कमेची लुटमार व विनयभंग केल्याची घटना घडली होती. याबाबत जत पोलिसात मुनीर खतुबद्दीन नदाफ (वय ४६ रा. नदाफ गल्ली, जत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची घटना १७ सप्टेंबर २०१९ रोजी घडली होती.
पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपी नदाफ यास अटक केली होती. त्यानुसार तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते यांनी जत न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोषपत्र दाखल केले होते. न्यायालयाने नुकतेच आरोपी नदाफ यास तीन वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून जे. जे. पाटील यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातून जाणाऱ्या जत-वळसंग रस्त्यावर एका पेट्रोल पंपाच्या बाजूला २७ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी एका महिलेला गावात सोडतो असे सांगून नेले होते. दरम्यान, संबधित महिलेला चाकूचा धाक दाखवून विनयभंग केला आणि महिलेकडून ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिनेसह रोख ५ हजार रुपयाची लूट करण्यात आली होती.
पोलिसांनी अखेर सीसीटीव्ही व पीडित महिलेने केलेल्या वर्णनानुसार आरोपी नदाफ यास अटक केले होते. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते करत होते. यानुसार न्यायालयात दोषारोष पत्र दाखल केले होते. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील जे. जे पाटील यांनी आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी, याबाबत युक्तिवाद केला होता.