पोलिसाच्या फ्लॅटमध्येच चोरट्यांचा सांगलीत डल्ला 
सांगली

Sangli Crime : पोलिसाच्या फ्लॅटमध्येच चोरट्यांचा सांगलीत डल्ला

भरदिवसा तीन फ्लॅट फोडले; 21 तोळे दागिन्यांसह रोकड लंपास

पुढारी वृत्तसेवा

सांगली : संजयनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला पोलिसाचाच फ्लॅट शनिवारी भरदिवसा चोरट्यांनी फोडला. पोलिस अंमलदार आणि निवृत्त शिक्षक यांच्यासह तिघांच्या फ्लॅटमध्ये ही चोरी झाली. तीनही ठिकाणांहून चोरट्याने सुमारे 21 तोळे सोन्यासह लाखो रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सह्याद्रीनगर येथील शिवबाळा दगडे अपार्टमेंटमध्ये महेश रामचंद्र शिंदे यांचा फ्लॅट आहे. ते निवृत्त शिक्षक आहेत. शनिवारी ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. अगदी काही मिनिटांतच फ्लॅटमध्ये हात साफ करत पोबारा केला. शिंदे यांच्या घरातून आठ तोळ्यांचे दागिने आणि पाच हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

त्यानंतर चोरट्यांनी चिंतामणीनगर येथील दोन फ्लॅटवर डल्ला मारला. संजयनगर पोलिस ठाण्याच्या पश्चिमेला मयुरेश रेसिडेन्सी अपार्टमेंट आहे. त्याठिकाणी पहिल्या मजल्यावर संजयनगर पोलिस ठाण्याचे अंमलदार कपिल साळुंखे यांचा फ्लॅट आहे. त्यांच्या फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याने पाळत ठेवून चोरट्यांनी चोरी केली. त्यानंतर याच अपार्टमेंटमधील आठव्या मजल्यावर नरेंद्र संभाजी खोकडे यांचा फ्लॅट आहे. त्यांच्या फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून घरातील सात तोळे दागिने आणि दहा हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT