सांगली : येथील मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावरील दरोडाप्रकरणी संशयित प्रिन्सकुमार शिवनाथ सिंग (वय 27, तानापूर, दिलावरपूर, जि. वैशाली, राज्य बिहार) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. दरोड्यावेळी त्याने दुचाकी पुरविल्याचे तपासात समोर आले होते. त्याचा डेहराडून कारागृहातून सांगली पोलिसांनी ताबा घेतला. दरम्यान, शनिवारी त्याला घटनास्थळी फिरविण्यात आले. त्याची कसून चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी 4 जून 2023 रोजी मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी पोलिस असल्याची बतावणी करीत सर्व कर्मचार्यांना बांधून घातले. बंदुकीचा धाक दाखवत 6 कोटी 44 लाख रुपयांच्या दागिन्यांची लूट केली होती. यावेळी दरोडेखोरांनी एका ग्राहकाच्या दिशेने गोळीबार केला होता. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर आणि पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा पडलेल्या या दरोड्याने राज्यात खळबळ उडाली होती.
या दरोड्यात बिहारमधील टोळीचा हात असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बिहारमध्ये तळ ठोकला होता. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सुबोध सिंग यालाही अटक केली. त्यानंतर महमद मुख्तार याला बिहारमधून अटक केली. त्यांच्या चौकशीत प्रिन्सकुमार याचे नाव निष्पन्न झाले होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. अखेर एका दरोड्याच्या गुन्ह्यात तो सापडला. त्यानंतर त्याची डेहराडून कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सांगलीतील दरोड्यात त्याचा सहभाग असल्याने विश्रामबाग पोलिसांनी डेहराडून पोलिसांशी व कारागृह प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. ट्रांझिट रिमांडद्वारे त्याला सांगली कारागृहात आणण्यात आले होते. तेथून विश्रामबाग पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली.
प्रिन्सकुमार हा दरोड्यावेळी दुचाकीवरून गस्त घालत होता. दरोड्यानंतर म्हैसाळ पुलाखाली दुचाकी सोडून त्याने पलायन केले होते. ही दुचाकी महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आली आहे. ती कर्नाटकातील असून लातूर येथून चोरल्याचे तपासात समोर आले होते. प्रिन्सकुमार याला अटक केल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी त्याला बंदोबस्तात घटनास्थळी फिरवले.
डेहराडूनमध्ये दोन वर्षांपूर्वी दिवाळीदिवशीच रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकून 20 कोटींचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. सांगलीतील दरोड्याप्रमाणेच डेहराडूनला टोळीने दरोडा टाकला होता. या गुन्ह्यात प्रिन्सकुमार याला डेहराडून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो तेथील कारागृहात होता. सांगलीतील दरोड्यात त्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी डेहराडून येथील न्यायालयात त्याचा ताबा मिळावा, यासाठी अर्ज केला. अखेर न्यायालयाच्या परवानगीने विश्रामबाग पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आला. शनिवारी त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.