Theft Pudhari
सांगली

Sangli Theft : चोरलेले मंगळसूत्र अल्पवयीन मुलीने गिळले

विटा बसस्थानकात चोरी; पोलिसांची तारांबळ

पुढारी वृत्तसेवा

विटा : विटा बसस्थानकावर चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र एका अल्पवयीन मुलीने अक्षरशः गिळून टाकले. या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

शनिवारी बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या संशयित अल्पवयीन मुलीला सतर्क प्रवाशांनी पोलिसांच्या मदतीने पकडले. संबंधित मुलीला पोलिस ठाण्यात आणण्यात आले, तेव्हा तिने चोरी केलेले मंगळसूत्र मणी आणि पदकासह चक्क गिळून टाकले. रंगेहात पकडलेला मुद्देमाल अचानक गायब झाल्याने पोलिसही चक्रावून गेले. मात्र, चाणाक्ष पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ तिला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी नेले. एक्स-रे तपासणीत सोन्याचे मंगळसूत्र पोटाच्या मोठ्या आतड्याकडे जात असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे उपस्थितांना मोठा धक्का बसला.

संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्याबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आले. दरम्यान, या मुलीने यापूर्वीही अशा प्रकारे तीन ते चार वेळा चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. सोन्याचे दागिने गिळल्यानंतर काही तासांनी ते शौचावाटे बाहेर पडतात, असा अनुभव या टोळीला असावा, असा संशय आहे. बसस्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना पुढे करून चोऱ्या करणाऱ्या टोळीचा शोध विटा पोलिस घेत आहेत.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सध्या नवरात्रोत्सवाचा काळ सुरू असल्याने बाजारपेठा, बसस्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT