theft case Pudhari Photo
सांगली

Sangli Theft Case : बिरणवाडी येथील घरफोडीचा छडा

१९ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : बिरणवाडी (ता. तासगाव) येथील सावळज रोडवरील एका बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लोखंडी लॉकरसह सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी आणि कटर मशिन असा एकूण १९ लाख २५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी नितीन खंडू यलमार (वय २८, रा. मतकुणकी, ता. तासगाव), अक्षय ऊर्फ नागेश बाबासाहेब बुधावले (वय २८, रा. बलगवडे, ता. तासगाव) आणि उमाजी भीमसेन गुजले ऊर्फ बंडू नाईक (वय २८, रा. बलगवडे, मूळ रा. करोली टी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे साथीदार कुणाल मंडले (रा. बलगवडे), अशपाक सलाते आणि सुखदेव ढोबळे (दोघे रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हे तिघे पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. बिरणवाडी हद्दीतील मधुकर मोरे यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी २३० किलो वजनाचे लोखंडी लॉकर पळवून नेले होते. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता.

तपासादरम्यान संशयित नितीन यलमार हा साथीदारांसह चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मतकुणकीकडून वासुंबे येथील ज्ञानसागर आंबेमळा अंगणवाडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पथकाने परिसरात सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने, १ लाख ३३ हजार ५०० रुपयांची रोकड, कटर, हायड्रॉलिक कटर आणि ग्राइंडर मशिन मिळून आले.

चौकशीत त्यांनी बिरणवाडी येथील बंद बंगल्यातून लॉकर चोरल्याची आणि बलगवडे येथे ते कटरने कापून त्यातील ऐवज वाटून घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडून ७ लाख ५७ हजार रुपयांचे ५४ ग्रॅम सोन्याचे दागिने, ९ लाख ५४ हजार रुपयांचे ४ किलो ३४० ग्रॅम चांदीचे दागिने व भांडी, रोख रक्कम, दुचाकी आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण १९ लाख २५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT