सांगली

सांगली : द्राक्षबागायतदारांच्या फसवणुकीचा सिलसिला सुरूच!

backup backup

तासगाव; दिलीप जाधव :द्राक्ष हंगामाच्या शेवटी उत्पादकांचे कोट्यवधी रुपये बुडवून व्यापार्‍यांनी पलायन करण्याचा प्रकार नवीन राहिलेला नाही. मात्र यंदाचा हंगाम तेजीत असतानाच मणेराजुरी (ता. तासगाव) भागातील 20 शेतकर्‍यांना 40 लाख रुपयांचा गंडा घालून व्यापार्‍याने पळ काढलेला आहे. स्थानिक एजंटाने हात वर केल्याने द्राक्षांचे पैसे मिळणार की नाही, या काळजीने संबंधित द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.

दरवर्षीच येणार्‍या अशा संकटातून शेतकर्‍यांची सुटका करण्यासाठी शासन आणि प्रशासन पातळीवर ठोस उपाययोजनांची गरज आहे. अन्यथा जिल्ह्यातील द्राक्षशेतीचे अर्थकारण, द्राक्षउत्पादक उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात 33 हजार 791 हेक्टर क्षेत्रावर विविध जातीच्या द्राक्षबागा आहेत. अंदाजे नऊ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षांपासून बेदाणा तयार केला जातो. तर 24 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे बाजारपेठेत जात असतात. यापैकी जवळपास साडेचार हजार हेक्टरवरील द्राक्षांची निर्यात होते, तर 20 हजार हेक्टरवरील द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेत जातात. तर जिल्ह्यात दरवर्षी द्राक्ष विक्रीतून 5 हजार कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल होते.

देशांतर्गत बाजारपेठेत जाणारी द्राक्षे विविध भागातील व्यापारी खरेदी करतात. दरवर्षी 800 ते 1000 च्या आसपास व्यापारी जिल्ह्यात येत असतात. द्राक्षबागायतदारांची ओळख नसल्याने स्थानिक एजंट हाताशी धरून व्यापारी द्राक्षे उधारीवर खरेदी करतात. एखाद्या – दुसर्‍या शेतकर्‍याची द्राक्षे रोखीने खरेदी केली जातात. एकदा का शेतकर्‍यांचा विश्वास बसला की नंतर 500 ते 1000 रुपये इसारत रक्कम देऊन लाखोंची द्राक्षे व्यापारी उधारीवरच घेऊन जातात. द्राक्षे घेऊन गेल्यानंतर पंधरा दिवस ते एक महिना कालावधीत शेतकर्‍यांना शिल्लक पैसे दिले जातात. दरम्यानच्या काळात शेतकर्‍यांचा विश्वास अबाधित रहावा यासाठी व्यापारी कोरे किंवा लाखो रुपयांचा आकडा लिहिलेले शेकडो धनादेश शेतकर्‍यांना देतात.

द्राक्षकाढणी हंगाम सुरू आहे तोपर्यंत सर्व व्यापारी शेतकर्‍यांना थोडी थोडी रक्कम देऊन बोळवण करतात. हंगाम संपताच व्यापारी पळ काढतात. पैसे अडकलेले द्राक्षउत्पादक शेतकरी व्यापार्‍यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांचे पैसे मागतात. वैतागलेले शेतकरी व्यापार्‍यांनी दिलेले धनादेश बँकेत भरतात. बहुतांशी धनादेश न वठता होऊन परत येतात. शेतकरी एजंटाकडे खेटे घालतात, परंतु एजंट हात वर करतात. आतापर्यंत परप्रांतीय व्यापारी फसवणूक करत होते. आता तर अनेकवेळा स्थानिक व्यापारीदेखील फसवणूक करू लागल्याने द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडू लागले आहे. भागातील शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एजंटांनाच अटक करुन मालमत्ता जप्त करावी, मालमत्ता विकून द्राक्षबागायतदारांचे पैसे वसूल करावेत, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT