सांगलीत पूर ओसरू लागला आहे.  
सांगली

सांगली : पूर ओसरू लागला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : धरण व नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे सांगलीत पूर ओसरू लागला आहे. कृष्णा, वारणा नदीकाठी दिलासा मिळाला. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 39 फूट 2 इंच होती. एकोणीस तासांत पाणी एक फूट एक इंचाने उतरले. दरम्यान, कृष्णा व वारणा नदीकाठावरील हजारो एकर शेती मात्र पाण्याखाली आहे. पाणी नदीपात्रात जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे.

कोयना धरण क्षेत्रात दोन दिवस पावसाचा जोर कमी आहे. कोयना क्षेत्रात 57 मिलिमीटर, नवजा 89 मिलिमीटर, महाबळेश्वरला 105 मिलिमीटर पाऊस झाला. रविवारी सातारा जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट होता. घाट परिसरात जादा पाऊस, तर अन्य क्षेत्रांत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज होता. पुढचे तीन दिवस ‘यलो अलर्ट’ आहे.

सांगली जिल्ह्यातील काही भाग वगळता पावसाने जवळपास उघडीप दिली आहे. त्यामुळे नदीकाठाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रविवारी कोयना धरणातून नदीपात्रात 32 हजार 200 क्युसेकने विसर्ग सुरू होता. दरम्यान, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणातून 17 हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. रविवारी सकाळी विसर्ग कमी करून तो 12 हजार क्युसेक केला आहे.

कराडमध्ये कोयना पुलाजवळ शुक्रवारी सकाळी 34 फूट पाणी होते. रविवारी सकाळी पाणी पातळी 28 फूट 3 इंच होती. दुपारी दोन वाजता 28 फूट, तर सायंकाळी पाच वाजता 28 फूट 3 इंच झाली. कराडमधील कृष्णा पुलाजवळील पाणीपातळीही कमी झाली आहे. शुक्रवारी सकाळी 27 फूट 6 इंच पाणी होती, रविवारी सकाळी 21 फूट 9 इंच, तर दुपारी 2 वाजता 21 फूट 3 इंच, सायंकाळी पाच वाजता 21 फूट 2 इंच पाणी होते. बहे पूल, ताकारी पूल, भिलवडी पुलाजवळील पाणी पातळीही कमी झाली आहे. रविवारी दुपारी दोन वाजता बहे पुलाजवळ पाणी पातळी 10 फूट 7 इंच, ताकारी पुलाजवळ 38 फूट 5 इंच, भिलवडी पुलाजवळ 39 फूट 6 इंच, आयर्विन पुलाजवळ 39 फूट 6 इंच होती. रविवारी सायंकाळी 5 वाजता बहे पुलाजवळ 10 फूट 5 इंच, ताकारी पुलाजवळ 37 फूट 10 इंच, भिलवडी पुलाजवळ 38 फूट 10 इंच, सांगलीत आयर्विन पुलाजवळ 39 फूट 5 इंच पाणी होते.

कृष्णा, वारणाकाठी पाणी पातळी इंचा-इंचाने उतरू लागली आहे. कृष्णा व वारणा नदीकाठावरील मळीभागातील हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली आहे. शिराळा तालुक्यातील मणदूर, सोनवडे, कोकरूड, सागाव, मांगले, वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द, तांदुळवाडी, भरतवाडी कणेगाव, कोरेगाव, ढवळी, शिगाव, बागणी तसेच मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील दुधगाव, कवठेपिरान आणि समडोळी या भागातील वारणाकाठची ऊस, भाजीपाल्याची शेती पाण्याखाली आहे. कृष्णा नदीकाठी तांबवे, रेठरेहरणाक्ष, भवानीनगर, बहे, बोरगाव, मसुचीवाडी, वाळवा, शिरगाव (ता. वाळवा), नागठाणे, पुणदी, नागराळे, बुर्ली, संतगाव, सूर्यगाव, आमणापूर, धनगाव, अंकलखोप, भिलवडी, चोपडेवाडी, सुखवाडी, ब्रह्मनाळ, खटाव, मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील नदीकाठच्या काही गावांतील पिकात पाणी आहे.

निवारा केंद्रास पालकमंत्र्यांची भेट

शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, आरवाडे प्लॉट, पटवर्धन पार्क, गोवर्धन प्लॉट, साईनाथनगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड, जगदंब कॉलनी, पंतलाईन, काकानगर, दत्तनगर या भागातून 484 कुटुंबांतील 2 हजार 45 व्यक्तींचे स्थलांतर झालेले आहे. महापालिकेच्या शाळा नंबर 17 व 23 मधील निवारा केंद्रात त्यांची सोय केलेली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शाळा नंबर 23 मधील निवारा केंद्रास भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी निवारा केंद्रातील सुविधांची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहायक आयुक्त सचिन सागावकर, अग्निशमन व आणीबाणी विभागाचे मुख्य अधिकारी सुनील माळी उपस्थित होते.

पूर ओसरेल तशी स्वच्छता सुरू

रोगराई उद्भवू नये तसेच अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पूर ओसरेल तशी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. 1 हजार 218 स्वच्छता कर्मचारी, 200 वाहने या मोहिमेत आहेत. रोगराई प्रतिबंधासाठी पावडर टाकली जात आहे. आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी (स्वच्छता) रवींद्र ताटे यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे.

तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता

सांगली जिल्ह्यामध्ये आगामी तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ते मध्यम पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यात 28 ते 31 जुलैदरम्यान तुरळक पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्यात आगामी तीन दिवस अतिवृष्टी ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवस मध्यम, तर सोलापूर जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे.

स्थलांतरित व्यक्ती, पशुधन...

* सांगली शहर : 2045 व्यक्ती, 347 जनावरे

* मिरज शहर : 460 व्यक्ती, 602 जनावरे

* मिरज तालुका पश्चिम भाग : 418 व्यक्ती, 473 जनावरे

* वाळवा तालुका : 1731 व्यक्ती, 2070 जनावरे

* शिराळा तालुका : 238 व्यक्ती, 1515 जनावरे

* पलूस तालुका : 347 व्यक्ती, 88 जनावरे

* एकूण : 5239 व्यक्ती, 5095 जनावरे

पातळी 38 फुटाच्या दिशेने

रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फूट 2 इंच होती. एकोणीस तासात पाणी एक फूट एक इंचाने उतरले. पाणी इंचा-इंचाने उतरत आहे. महापुराचा धोका तूर्तास टळल्याने लोकांतून समाधान व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT